गोरेगाव,दि.23 : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत जि.प. शाळा पिंडकेपार येथे २१ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शालेय विविध विषयावर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितीत मार्गदर्शकांकडून गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की, आदिवासींचे जाती प्रमाणपत्र तयार करून सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व गावातील गणमान्य पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत घासले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरपंच दुलीचंद रहांगडाले, मुख्याध्यापक पी.डी.पटले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश बिसेन, दुर्योधन पटले, राजाराम गाते आदी उपस्थित होते. शासनाने नव्यानेच गोवारी जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. गोवारी समाजाच्या अनेक विद्यार्थी व लाभार्थ्यांकडे जाती प्रमाणपत्र नाहीत त्यामुळे त्यांना आदिवासी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासीची सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी जातप्रमाणपत्र तयार करावे व विद्यार्थ्यांनी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून शालेय गणवेशाचा वितरण वरिष्ठ पालकांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दुर्गा रहांगडाले, प्रमिला साखरे, रामकला जोशी, कविता राऊत, वनिता सोनवाने, शिक्षक युवराज बोपचे, मुनेश्वर कटरे, ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले.




