मुंबई, 20 मे: संपूर्ण देशासह राज्यात कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. टाळेबंदीमुळे महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे याचे परिणाम प्रशासकीय कामकाजावर जाणवू लागले आहेत. भविष्यातही याचे दृश्य परिणाम जाणवू लागतील. त्यामुळे पुढील येणाऱ्या काळाला समोरे जाण्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीमध्ये त्यानुरुप बदल करण्याच्या अनुषंगाने दैनदिन प्रशासनात अधिकाधीक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतिमान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. गतिमान आणि पारदर्शी प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञानाबरोबर कौशल्य वाढीवरही अधिक भर द्यावा लागणार असून त्यासाठी कालपरत्वे होणाऱ्या बदलांना समोरे जाणे अत्यंत निकडीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘कॅपेसिटी बिल्डींग प्रोग्राम फॉर एडमिनीस्ट्रेटर्स’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. युजीसी-एचआरडीसी मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे या ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी केंद्रबिंदू लक्षात ठेऊन प्रशासकीय सेवा अधिक सक्षमपणे कशा देता येतील, कोव्हिडनंतरच्या परिस्थितीचा सामना करताना प्रशासनात करावे लागणारे बदल आणि या अनुषंगाने आत्मसात करावी लागणारे कौशल्य यासाठी निर्माण करावयाची क्षमता अशा विविध बाबींवर त्यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. तर कोरोनानंतरच्या काळात विद्यापीठीय प्रशासनात ई-प्रशासन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकिय दस्तऐवज तयार करताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर आरोग्याची निगा घेऊन अधिक सक्षमपणे कार्यसंस्कृती रुजविण्यासाठी सर्वांनी कालपरत्वे होणाऱ्या बदलांना समोरे जावे लागणार असल्याचे प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
या दोन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराच्या आज झालेल्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. राजेंद्र पाटील यांनी दैनदिन प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा अधिक सक्षमपणे कसा वापर करावा याचे प्रशिक्षण दिले. यात त्यांनी व्हिडियो कॉन्फरंशींगसाठी मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल फॉर्म्स, एक्सेल, डॉक्स, टिथरिंग अशा अनुषंगिक विषयावर मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी टाळेबंदीनंतर कार्यसंस्कृतीमध्ये होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला. दैनदिन प्रशासनात हाताळावयाची कागदपत्रे, बैठका, भागधारकांशी करावयाचा संवाद, कार्यालयात वावरताना घ्यावयाची काळजी आणि त्याच अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे, आयुष मंत्रालयांनी आरोग्याची काळजी घेताना निर्गमित केलेल्या सूचना अशा विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. तर यशदा पुणे येथील डॉ. भारत भूषण यांनी होम ऑफीस पर्स्पेपेक्टिव्ह विषयावर मार्गदर्शन करताना कोव्हिड संकटाशी सामना करताना आपल्यातील कार्यकौशल्य, क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयावर मार्गदर्शन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी या दोन दिवसीय ऑनलाईन शिबिराची पार्श्वभूमी विशद करताना सांगितले की, हे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर त्रिस्तरीय असून पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर उर्वरीत वर्गातील अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. युजीसी-एचआरडीसीच्या संचालिका डॉ. के. शांती, समन्वयक प्रसेनजित खंडेराव, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. श्रीवरमंगई आणि आस्थापना विभागाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे यांनी या शिबिराचे यशस्वीरित्या नियोजन केले. बुधवार २० मे, २०२० रोजीच्या दुसऱ्या सत्रात हेल्थ अँड हायजिन या विषयावर डॉ. जसवंत पाटील, सायबर सिक्युरिटी या विषयावर विवेक सावंत आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ड्यूरिंग कोव्हिड टाईम्स या विषयांवर डॉ. हरिश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.




