जिल्ह्यातील मदरशे आधुनिक होणार

0
7

विविध सोयींसाठी अनुदान मिळणार

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती

गोंदिया- जिल्ह्यातील नोंदणीकृत मदरशांच्या पायाभूत सुविधा निर्माण करून आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अधिकृत मदरशांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या मदरशांना २ लाखापर्यंत अनुदान देय असणार आहे.
मदरशांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, इमारतीची देखभालदुरुस्ती व नूतनीकरण, फर्निचर, निवासस्थानी इन्व्हर्टरची सुविधा, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स, प्रयोगशाळा साहित्य, सायंस किट, मॅथेमेटिक्स किट व इतर अध्ययन साहित्य आदी कामे व सुविधा पायाभूत सुविधेअंतर्गत करण्यात येणार आहे.
मदरशांच्या इमारतीचे आकारमान, क्षेत्रफळ तसेच विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन मागील वर्षी निर्माण केलेल्या सुविधा जर अपुर्‍या असल्याचे नमुद केल्यास अपवादात्मक परिस्थितीत पुन्हा सुविधांसाठीची मागणी केल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती अंतिम निर्णय घेईल.
मदरशातील ग्रंथालय व प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक संच देण्यासाठी बुक बँक सुविधा पुरविण्यात येईल. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक साहित्य, कंपास बॉक्स आदि उपलब्ध करून देण्यासाठी एकदाच ५0 हजार रुपयांचे अनुदान देय असेल. यानंतर दरवर्षी ५हजार रुपये अनुदान मिळेल. जिल्ह्यातील मदरशा संचालकांनी योजनेच्या यशस्वीतेसाठी मदरशांमध्ये नेमण्यात येणार्‍या शिक्षकांचे मानधन, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, योजनेची कार्यपध्दती योजनेच्या अटी व शर्ती अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती व इतर आवश्यक माहिती नमूद करायची आहे.