स्वार्थासाठी गट्टीः गोंदिया जि.प.वर भाजप-कॉंग्रेसचा झेंडा

0
12

गोंदिया दि.१६ – गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला ठेगा दाखवत परंपरागत विरोधी भाजपच्या मदतीने अध्यक्षपद आपल्या झोळीत पाडून घेतले. सर्वात कमी संख्याबळ असतानाही काँग्रेसच्या उषा मेंढे यांना भाजपने अध्यक्षपद बहाल करून सत्तेत वाटा मिळविला. जनमत विरोधी असताना सुध्दा आपले कसब पणाला लावून रचना गहाणे यांना उपाध्यक्षपदी बसवत सत्तेची हौस भागवली.
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदांच्या निवणुकीत भाजपने कॉंग्रेसशी हातमिळवणी करीत सत्ता काबीज केली. परिणामी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून होते. भाजपने केंद्रात व राज्यात दणदणीत विजय मिळविल्याने भाजपात कमालीचा उत्साह होता. मात्र, अल्पावधीतच लोकप्रियतेचा फुगा फुटल्याने गोंदिया-भंडारा जिल्ह्यात भाजपची दैना उडाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी या परंपरागत मित्र पक्षांनी भाजपवर प्रंचड तोंडसुख घेत प्रचारात आघाडी मिळवली होती. या दरम्यान, या दोन्ही मिक्षपक्षांनी भाजप कशी जनविरोधी आहे, हे लोकमनावर बिंबवले. मतदारांनी त्यांच्या प्रचाराला साद देत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भरभरून मते दिली. यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत सर्वाधिक 20 जागा घेत राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर, 17 जागा कायम राखत भाजप दुसऱ्यास्थानी तर कॉंग्रेस 16 जागा घेत तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेला. कोणताही पक्षाला बहुमत नसल्याने सत्तास्थापन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाची साथ अपेक्षित होती. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाला जनतेने कौल दिला असता आणि दोन्ही केंद्रात व राज्यात हातात हात मिळवून असताना गोंदियातही ही नैसर्गिक युती कायम राहील, अशी मतदारांची धारणा होती. पण लोकांच्या भावनेला कॉंग्रेस पक्षाने तडा दिल्याने भविष्यात अशा पक्षाचा विचार करावा लागेल, असा मतप्रवाह जनतेत आहे.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित जि.प. सदस्यांची सभा आयोजित केली होती. दुपारी ३ ते ४.३0 या कालावधीत काँग्रेसतर्फे उषा मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजलक्ष्मी तुरकर तसेच भाजपकडून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले होते. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे पी.जी. कटरे, राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर आणि भाजपच्या रचना गहाणे यांनी दुपारी १ वाजेपर्यंत आपले नामांकन सादर केले. मात्र, एनवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी तर उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून पी.जी.कटरे यांनी माघार घेतली. या सभेत झालेल्या मत विभाजनात अध्यक्षपदाकरिता उषा मेंढे यांना ३३ तर राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २0 मते मिळाली. उपाध्यक्षपदाकरिता भाजपच्या रचना गहाणे यांना ३0 तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना २0 मते पडली. काँग्रेसचे सदस्य पी.जी.कटरे, विमल नागपुरे आणि रमेश अंबुले यांनी तटस्थ राहून उपाध्यक्षपदाकरिता कोणालाही मतदान केले नाही. दरम्यान, या तिनही सदस्यांनी मतदान का केले नाही, हे ही संशयास्पद आहे.
या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर कार्यकर्त्यांसह कर्मचार्‍यांची मोठी गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता.

अखेर साप्ताहिक बेरार टाईम्सच वृत्त खरे ठरले

■ साप्ताहिक बेरार टाइम्सने आपल्या अंकात जि.प.च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचे भाकित वर्तविले होते. ते अगदी तंतोतत खरे ठरले. या अंकात राष्ट्रवादी कॉंग्रेसला दूर सारून कोण कोणाची वर्णी लागणार यावर भाकित वर्तविले होते. कॉंग्रेस व भाजपची स्थानिक मंडळी एकमेकांवर कितीही कुरघोडी करत असले तरी आपापले घोटाळे उघड होऊ नये, यासाठी फार पूर्वीपासूनच प्रयत्नरत होते. त्यामुळे ही अभद्र युती केवळ स्वार्थापोटीच जन्माला आल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी आमची कोणतीही युती नसल्याचा दावा केला असला तरी दोन्ही अग्रवाल द्वयांनी ही खिचडी शिजवल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद वर्तुळात होती.