नववी नापासांना दहावीत प्रवेश

0
16

गोंदिया दि.१८:विद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो. ही आतापर्यंतची प्रथा दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने नविन परिपत्रक निर्गमित केल्याने नववी नापास विद्यार्थ्यांना थेट अर्ज भरुन १० वीच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.

इयत्ता नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सन २०१४-१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विहित अटींची पुर्तता केल्यास फार्म नं. १७ भरुन माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये नापास झालेले विद्यार्थी पुन्हा इयत्ता नववी मध्येच दाखल होताच आणि इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेवून माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होतात.

असे विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये नापास झाल्याने त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाते. सदचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर खाजगीरित्या प्रविष्ठ होण्यासाठी अटींचे पालन करीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शालांत परिक्षांना प्रविष्ठ होता येईल. असा शासन निर्णय झालेला असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी (माध्य.) व शाळा प्रमुखांना अशा ईच्छुक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याची सुचना केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे हे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.