भाजपाने घेतले काँग्रेसरुपी सडक्या गालाचे चुंबन – उद्धव ठाकरे

0
11

मुंबई, दि. १७ – गोंदिया जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी झालेली भाजपा-काँग्रेसची युती शिवसेनेला चांगलीच झोंबली असून ही काय (काळा) कांडी आहे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनातून विचारला आहे. सत्तेसाठी २५ वर्षांचे मित्र दुश्मन होतात तर जन्माचे वैरी अचानक मित्र बनतात अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
भाजपने कोणाचा सडका गाल चुंबावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे, तरी महाराष्ट्रातील जनतेला गोंदियाचा गोंद्या हलवा पचनी पडेल असे वाटत नाही. ज्यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लढायचे, वस्त्रहरण करायचे त्याच वस्त्रहरणातील चिंधी उपरणे म्हणून खांद्यावर टाकून मिरवायचे. यामुळे तात्पुरते सुख मिळाले असले तरी या सुखाचे काटे भविष्यात टोचतील, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे. तसेच सत्तेसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीशी मिठ्या मारणे ही जनतेशी प्रतारण आहे, असेही उद्धव यांनी भाजपाला सुनावले आहे.
राजकारणात कोण कुणाच्या गळ्यात गळा घालेल ते सांगता येत नाही व कोण कुणाची तंगडी ओढेल त्याचा भरवसा नाही. पंचवीस वर्षांचे मित्र दुश्मन होतात तर जन्मापासूनचे वैरी अचानक मित्र बनतात. हा सर्व चमत्कार सत्ता व मत्तेचा आहे. या चमत्काराची कांडी विदर्भ भूमीत गोंदिया जिल्ह्यात फिरली असून या कांडीने अनेकांची डोकी गरगरली आहेत. राष्ट्रवादीस सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी व पदरात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पाडून घेण्यासाठी भाजपने कॉंग्रेसला कवेत घेतले आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला आहे व विधानसभेत कॉंग्रेसने भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व अनागोंदीचे आरोप केले. त्यामुळे कॉंग्रेसने भ्रष्टाचारास मिठी मारली की भाजपने कालच्या भ्रष्टाचार्‍यांना पवित्र करून सोयरिक जमवली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी वाटला नाही आणि कॉंग्रेसलाही भाजप जातीयवादी असल्याचा विसर पडला. हा एक चमत्कारच आहे.