योजना विकासाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

0
17

गोंदिया,दि.14 राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. पारंपारिक पिकांसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून या योजनेकडे पाहण्यात येते. खर्चाच्या मापदंडाच्या 50 टक्के देय अनुदानावर महाडीबीटी प्रणालीवर या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

उद्देश:- भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, शेतीपुरक व्यवसायाची संधी व ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वंय रोजगार उपलब्ध करून देणे, पिक रचनेत बदल घडवुन आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.

 राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना अंतर्गत जिल्हयात भाजीपाला रोपवाटिकांची उभारणी करावयाची असुन कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी प्रति रोपवाटिका प्रकल्प मुल्य रक्कम रु. 5.55 लाख ग्राहय धरुन रक्कम रु. 2.78 लाख (50 टक्के याप्रमाणे) अनुदान अनुज्ञेय आहे. यातील शेडनेट या घटकाला प्रकल्प मुल्य रक्कम रु. 3.80 लाख च्या 50 टक्के रक्कम रु. 1.90 लाख इतके अनुदान देण्यात येत

होते.

          शेडनेट उभारणीकरिता लागणारे साहित्य, वेल्डींग, फॅब्रीकेशन, वाहतुक, मजुरी तसेच स्टीलच्या दरात वाढ झाल्याने शेडनेट या घटकाच्या प्रकल्प मुल्यात रक्कम रु. 3.80 लाख मध्ये वाढ करून रु. 4.75 लाख करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुर्वीचे अनुदान रु. 1.90 लाखामध्ये रु. 0.48 लाख इतकी वाढ करुन रक्कम रु. 2.38 लाख इतके अनुदान शेडनेट या घटकाकरिता वाढविण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने नवीन मापदंडानुसार शेडनेट उभारणीकरिता रक्कम रु. 2.375 लाख, प्लॉस्टिक टनेल करिता रक्कम रु. 0.30 लाख, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर रक्कम रु.0.038 लाख व प्लॉस्टिक क्रेटस करिता रक्कम रु. 0.062 लाख असे एकुण रक्कम रु.2.775 लाख अनुदान नवीन मापदंडानुसार देय राहील. परंतु सदरचे अनुदान 22 ऑगस्ट 2022 पासुन पुर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना लागू राहील.

 इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in  या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत. ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतरच प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत तालुका कृषि अधिकारी यांचे मार्फत पुर्वसंमती देण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव शा.चव्हाण यांनी केले आहे.