रेशमाची शेती करुन मातीतून मोती पिकवा

0
10

रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पुरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नविन तुती लागवड पध्दत व नविन किक संगोपन पध्दतीमुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करुन घेता येतो. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशमाची शेती करुन मातीतून मोती पिकवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अळीच्या खाद्य प्रकारावरुन तुती रेशीम, टसर रेशीम, मगा रेशीम, एरी रेशीम असे रेशमाचे चार प्रकार पडलेले आहेत. एकूण रेशीम उत्पादनाच्या 90 ते 95 टक्के तुती रेशीमचे उत्पादन घेतले जात आहे. रेशमाच्या चारही प्रकारात हे उच्च दर्जाचे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये तुती रेशीम आणि टसर रेशीम या दोन प्रकारचे रेशीम उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम हे पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील 24 जिल्ह्यामध्ये तर टसर रेशीम हे पुर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यामध्ये घेतले जाते.

तुती लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने दरवर्षी लागवड करावी लागत नाही, त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांस देखील हा व्यवसाय करता येतो.

कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून ते जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्यारितीने करता येतो. पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत मजुरांऐवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करुन घेता येते. यामुळे मजुरी खर्चात व वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळ्यांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासनामार्फत पुरवली जातात. रेशीम अळ्यांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैकी सुरुवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या 14 दिवसात कोश उत्पादनाचे पीक घेता येते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व पैसा वाचतो.

रेशीम शेतीमुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहे. तुती लागवड करुन शेतकऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण सुध्दा केले आहे. काही शेतकरी कमी जागेत व कमी पैशात या उद्योगात यशस्वी झाले आहेत. रेशीम हा एक प्रकारचा पतला आणि चमकदार धागा असतो. ज्याच्यापासून कपडे विणले जातात. हा धागा फिलामेंटस सेलमध्ये राहणाऱ्या किटकापासून तयार केला जातो. रेशीमचे कपडे, रेशीम धागे, रेशीमचा रुमाल तर खुप प्रसिध्द आहे. खूप वर्षापासून रेशीमने आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. रेशीम पासून तयार होणाऱ्या सिल्कच्या साडी तर खुपच प्रसिध्द आहेत. आज सुध्दा रेशीमच्या कापडाची तेवढीच मागणी आहे आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच महिला आहेत ज्या सिल्क साडी आवडीने घालतात. रेशीम धाग्याला बाजारात खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी दरवर्षी वाढत चालली आहे.

लाभ कोणाला घेता येणार :- अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटूंब, महिला प्रधान कुटूंब, शारिरीक अपंगत्व प्रधान कुटूंब, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्यनिवासी कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

रेशीम लागवड अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे :- जमिनीचा 7/12 व 8अ उतारा, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अथवा मतदान कार्ड, मनरेगाच्या जॉबकार्डची झेरॉक्स प्रत.

रेशीम शेती लागवडीसाठी किती अनुदान दिले जाते :- रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून एकूण 3 लाख 42 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

रेशीम लागवड अनुदानासाठी अर्ज कुठे करावा :- रेशीम लागवड अनुदान योजना मनरेगाच्या माध्यमातून राबविण्यात येते, त्यामुळे इच्छुक लाभार्थी संबंधित ग्रामपंचायतमध्ये अर्ज करु शकतात.

रेशीम उद्योगासाठी लागणारी जमीन :- या व्यवसायाकरीता लागणाऱ्या जमिनीचा विचार केला तर याला 1 एकर शेती लागेल व 1700 स्क्वेअर फुट शेड, ज्यामध्ये आपण रेशीम अळ्यांचे संगोपन करु शकतो. हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शेतीची आवश्यकता आहे. ज्यामध्ये आपल्याला तुती या रोपाची लागवड करावी लागते. या तुतीच्या पाल्यावर आपल्याला रेशीम किडे जगवावे लागतात, हा पाला त्यांना खाऊ घालावा लागतो.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता तुती लागवडीसारख्या रेशीम कोश उत्पादनाची योजना वापरात घेऊन भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवून आपले जीवन उज्ज्वल करावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रेशीम विकास अधिकारी श्रेणी-1/2 यांचेशी संपर्क साधावा.

– के. के. गजभिये

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया