प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
4

गोंदिया, दि.14 : केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वाकांक्षी योजना असून त्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले.

        प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने 9 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील सरपंच, नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचारी यांची एक दिवशीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

        कार्यक्रमाचे आयोजन सुक्ष्म, लघु व मध्यम रोजगार मंत्रालय नागपूर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, नगरपरिषदेचे गट विकास अधिकारी आनंद पिंगळे, सहायक संचालक एमएसएमई श्री. मिश्रा, सहायक संचालक एमएसएमई व्ही.व्ही.खरे नागपूर तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे गोंदिया जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रजीत देविपुत्र उपस्थित होते.

        प्रधानमंत्री विश्वकर्मा ही योजना देशात 17 सप्टेंबर 2023 रोजी कार्यान्वित झाली असून बारा बलुतेदारांची ओळख निर्माण व्हावी, त्यांना स्थैर्य प्राप्त व्हावे तथा योग्य मार्केटिंग उपलब्ध व्हावी याकरीता त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, टुलकिट देणे, 5 टक्के दराने बँकाकडून कर्ज उपलब्ध करुन देणे इत्यादींचा तथा 18 प्रकारचे उद्योग करणाऱ्या कारागिरांचा समावेश प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

        याकरीता लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत येथून ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी. सरपंच तसेच मुख्याधिकारी यांनी अर्जाची योग्य पडताळणी करुन संबंधित अर्ज जिल्हाधिकारी गोंदिया यांचे लॉगिनमध्ये शिफारस करुन पाठवावीत. तसेच ग्रामपंचायत सरपंच, नगरपरिषद, नगरपंचायत यांना अडचणीबाबत मार्गदर्शन व इत्यादी बाबीची जनजागृती होणे तथा योग्यप्रकारे योजनेची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.