रेडियोकॉलर लावलेला माळढोक बेपत्ता

0
18

चंद्रपूर दि. ७- : जगातील अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास आहे. प्रगणनेमध्ये माळढोक पक्ष्यांची संख्या १० पर्यंत पोहचली आहे. माळढोक पक्षांचे ‘लोकेशन’ संवर्धन करणाऱ्या वनविभागाला मिळावे, त्यासाठी एका माळढोक नर पक्ष्याला डिसेंबर १४ मध्ये रेडिओकॉलर चिप डेहराडून येथील तज्ज्ञांनी लावली. चिप लावल्यानंतर तीन ते चार महिने या माळढोक पक्षाचे लोकेशन मिळत होते. मात्र मागील १५ महिन्यांपासून चिप लावलेल्या माळढोक पक्षाचे लोकेशन मिळणे बंद झाल्याने वनविभागास पक्षी मित्र चिंतेत सापडले आहे.

शेतातील साप, विंचू, किटक अलगद वेचून माळढोक पक्षी खात असल्याने या पक्षाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. जगात अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे माळढोक पक्षी महाराष्ट्रातील नानज परिसरात सध्या बोटावर मोजण्याइतके आहे. तर हेच माळढोक पक्षी अकरा वर्षांपूर्वी वरोरा परिसरातील वनोजा, मार्डा आदी गावाच्या शिवारात आढळून आहे. वरोरा परिसरात माळढोक पक्षाची अंडीही आढळून आली होती. वरोरा तालुक्यासोबतच माळढोक पक्षी भद्रावती तालुक्यातील भटाळी परिसरात मागील काही वर्षांपासून आढळून येत आहे.

माळढोक पक्षाची संख्या याच परिसरात वाढत असल्याने त्या पक्षाच्या संवर्धनाकरिता वनविभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक उपाययोजना कार्यान्वित केल्या आहेत. पावसाळ्यापासून शेतातील पिके निघतपर्यंत माळढोक पक्षी वरोरा व भद्रावती परिसरात दिसत असतो. त्यानंतर तो दिसेनासा होवून पावसाळ्यामध्ये परत येतो.

पिके निघाल्यानंतरही माळढोक पक्षाचे अस्तित्व वेळोवेळी दिसावे, याकरीता डेहराडून येथील संस्थेच्या तज्ज्ञांनी एका माळढोक नर पक्षाला डिसेंबर २०१४ मध्ये रेडीयोकॉलर चिप लावली. त्यानंतर तीन महिने लोकेशन मिळत होते.

मात्र मागील पंधरा महिन्यांपासून चिप लावलेल्या माळढोक पक्षाचे लोकेशन बंद झाले आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्या माळढोक पक्षाचा वनविभाग शोध घेत आहे.

रेडिओकॉलर चिप लावलेल्या माळढोक पक्षाचा शोध मागील काही महिन्यांपासून परिसरातील ४० गावांत घेण्यात येत आहे. मॉनेटरिंग करणे सुरू आहे. परंतु सुगावा लागला नाही. चिप लावलेला माळढोक पक्षी कुठे तरी दूर निघून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.