सालेभाटा येथे दारूबंदीचा एल्गार

0
21

लाखनी दि.२३: तालुक्यातील सालेभाटा येथे गुरूवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित विशेष महिला ग्रामसभेत शेकडो महिलांनी एकमुखाने दारूबंदीचा ठराव पारीत करून दारूबंदीचा एल्गार पुकारला. गावातील ५१ महिला बचत गटांनी व ग्रामपंचायतीने या सभेचे आयोजन केले होते.
सामाजिक कार्यकर्ते नरेश बोपचे, विनोद रहांगडाले, चंद्रशेखर रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य कैलास भगत, मुलचंद बोपचे, चंडीलाल रहांगडाले आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. दारूबंदी आंदोलन म्हणजे केवळ व्यसनमुक्त आंदोलन नसून महिलांच्या सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचा लढा असल्याचे मत नरेश बोपचे यांनी व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचा मिलिंदा टेंभूर्णे होत्या. गावातील मतदार यादीतील एकूण महिला मतदार संख्येच्या २५ टक्के महिलांनी पुढाकार घेवून गावात दारूबंदीची मागणी केल्याने शासनाला यावर विचार करणे भाग पडते. याच अनुषंगाने या विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील ९00 महिला मतदारांपैकी ४00 महिला यावेळी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे गावातील सर्व ५१ महिला बचत गटाच्या महिलांनी यात सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी सर्वमहिला बचत गटातील सदस्यांचा समावेश असलेली ५१ महिलांची दारूबंदी समिती तयार करण्यात आली. गावातील महिला ग्रामपंचायत सदस्या सोनवाने, जांभूळकर, बघेले व भोंडे यांचा यात समावेश करण्यात आला. उपस्थित महिलांनी यावेळी दारूबंदी आंदोलनात निष्ठेने सक्रीय सहभाग घेण्याची शपथ घेतली. सभेचे संचालन ग्रामसचिव विलास खोब्रागडे यांनी केले तर आभार विनोद रहांगडाले यांनी मानले.