न्या.बोबडेंनी बघितले सारस संवर्धनासाठी ग्रामस्थांचे कौतूक

0
13

 

गोंदिया,दि.१ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या.एस.ए.बोबडे हे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प बघण्यासाठी जिल्ह्यात आले असता त्यांनी बुधवारी ३० डिसेंबर रोजी सारस महोत्सवा दरम्यान परसवाडा व झिलमिली येथील माजी मालगुजारी तलाव परिसराला भेट देऊन सारस पक्षी बघितले.
राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळून येणारा सारस पक्षी बघून न्या.बोबडेंना आनंद झाला. यावेळी त्यांनी दुर्मिळ होत चाललेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या परसवाडा व झिलमिली ग्रामस्थांचे कौतूक केले. नामशेष होत चाललेल्या सारसांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून सारस महोत्सवाचे आयोजन करुन यासाठी लोकचळवळ उभारणारे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. परसवाडा येथील अनेक घराच्या भिंतीवर सारस व स्थलांतरीत पक्षांचे काढलेले चित्र बघून त्यांनी आनंद व्यक्त केला.
न्यायमुर्ती एस.ए.बोबडे यांना येथील तलावांवर येणाऱ्या विविध प्रजातीच्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांबाबतची माहिती मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार व वन्यजीव प्रेमी पक्षी अभ्यासक मुकूंद धुर्वे यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी उमेश काळे, तहसिलदार संजय पवार, यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.