धोरणकर्ते आणि कार्यकर्ते यांचं व्यसनमुक्तीसाठी ‘संमेलन ‘ ! – मुक्ता पुणतांबेकर

0
20

चौथे व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा मुक्ता पुणतांबेकर यांचा व्यसनमुक्ती जनजागृतीपर लेख

व्यसनाधिनता ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, कौटूंबिक हिंसाचार, अपघात, आत्महत्या असे अनेक सामाजिक प्रश्न त्यातून निर्माण होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार व्यसनाधिनता हा कॅन्सर व एड्सनंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मृत्यूकडे नेणारा गंभीर आजार आहे. तसेच हे दोन आजार होण्यासाठी सुध्दा अप्रत्यक्षपणे व्यसन कारणीभूत होऊ शकते. घरातील व्यक्ती जेव्हा व्यसन करत असते, तेव्हा त्या कुटूंबातल्या सर्वांनाच त्याचा त्रास होतो. व्यसनामुळे शारीरीक, मानसिक, कौटूंबिक, आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम होतात. असे असूनही समाजात व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. वाढत्या व्यसनाधिनतेला रोखायचे असेल, तर धोरणात्मक पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच व्यसनमुक्ती ही लोकचळवळ होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करायला हवेत. याच भूमिकेतून महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दरवर्षी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेण्यात येते. यंदा हे संमेलन गोंदिया जिल्हयात २२ आणि २३ जानेवारी २०१६ या दिवशी होत आहे. पहिलं साहित्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २०१३ मध्ये पूण्यात झालं. दुसरं संमेलन २०१४ मध्ये नागपूरला आणि तिसरं संमेलन २०१५ मध्ये मुंबईला झालं. या तिन संमेलनांमुळं या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ञ व्यक्ती यांच्या कामाचं-विचाराचं आदान-प्रदान होण्याची एक चांगली प्रक्रीया सुरु झाली. त्यामुळं व्यसनमुक्तीच्या कामाचं चांगलं नेटवर्कींगही साधता आलं. विविध विषयांवरची सत्र-चर्चा यामुळं ज्ञान वाढण्याच्या दृष्टीनंही उपयोग झाला. यंदाचं हे संमेलनाचं चौथं वर्ष, ही प्रक्रीया या संमेलनातूनही अधिक बळकट होईल, असा मला विश्वास वाटतो.
इतकंच नव्हे, तर ही संमेलनं केवळ या क्षेत्रातील कार्यकर्त्यापूरती मर्यादीत राहीली नाही तर त्या त्या भागातील शाळांनाही यात सहभागी करुन घेतलं गेलं आहे. पुढची पीढी जी व्यसनांकडे वळू शकते त्यांच्यातही जनजागृतीकरण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जातो. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारङ्क देवून व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेचा गौरव दरवर्षी करण्यात येतो. हे संमेलनाचं आणखी एक वैशिष्टय. पहिल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात हा पुरस्कार आमच्या ‘मुक्तांगणङ्क या संस्थेला मिळाला होता. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं बळ आणि उत्साह वाढण्याच्या दृष्टीनं या पुरस्काराचं मोल निश्चितच आहे.
सिगारेट, दारु, ड्रग्ज वगैरे अंमली पदार्थाना ‘ग्लॅमरङ्क येत आहे. त्यामुळे युवक-युवती त्याकडे आकर्षित होत आहे आणि अकारण अंमली पदार्थाना प्रतिष्ठा मिळत आहे. व्यसन करणं हे प्रतिष्ठेचं नसून व्यसनमुक्त राहाणं, हेच प्रतिष्ठेचं आहे. या बाजूनं समाजमन तयार करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि स्नायूविज्ञान संस्थेनं एक आकडेवारी नुकतीच प्रसिध्द केली आहे. त्यातल्या एका आकडेवारीनूसार आपल्या सरकारला मागच्या वर्षी केवळ दारुपासून २१६ अब्ज रुपये उत्पन्न मिळालं; पण दारुमुळं होणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी २४४ अब्ज रुपये इतका खर्च आला. या एका आकडेवारीवरुन व्यसन आणि व्यसनमुक्ती या विषयाला खुप कंगोरे आहेत, हे स्पष्ट होतं. व्यसनमुक्तीसाठी दोन दिशेनं कामं करावं लागतं. पहिली : व्यसनाची उपलब्धताच कमी करणं(सप्लाय रिडक्शन). दुसरी : लोकांची व्यसनाची जी गरज आहे, ती कमी करणं(डिमांड रिडक्शन). व्यसनमुक्ती होण्यासाठी या दोन्ही भूमिकांवर समांतर पध्दतीनं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. यातली पहिली भूमिका जबाबदारीनं पार पाडण्याचं काम सरकारचं आणि जनजागृती करणं, व्यसनाधीन झालेल्यांवर उपचार करुन दुसरी भूमिका पार पाडण्याचा काम व्यसनमुक्ती क्षेत्रातल्या संस्थाचं !

या संमलेनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. या दोन्ही व्यवस्थांचं ‘संम्मीलनङ्क म्हणजेच व्यसनमुक्ती साहित्य संमेलनं ! या एकत्रीकरणातून, या संमेलनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणं, व्यसनमुक्त राहाणं या गोष्टीला प्रतिष्ठा मिळवून देणं ही सरकार आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांबरोबरच प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. ही जबाबदारीच अधिक ठळकपणे मांडण्याचं, अधोरेखित करण्याचं काम या संमेलनातून होईल, असे वाटते.