सालेभाट्यात झाली दारुबंदी,महिला शक्तीला यश

0
12

 

लाखनी दि.28-: तालुक्यातील सालेभाटा येथील महिला शक्तीने एकत्र येऊन दारुबंदी संघर्ष समिती स्थापन करून गाव दारुमुक्त करून वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. गावातील देशी दारुचे दुकान व बार बंद करण्यात आल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.मतदान प्रक्रियेने पवनी तालुक्यातील खैरी (दिवान) गावात दारुबंदी झाली त्यानंतर लाखनी तालुक्यातील सालेभाटाचा दुसरे गाव ठरले आहे.
सालेभाटा येथे दारुबंदीविषयी महिला जागरूक होऊन जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन मतदान करण्याची विनंती केली होती.त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी महिलांचे मतदान घेण्याचे आदेश दिले. महिलांचे मतदान ९८८ होते. फेरनिवेदनातील महिलांची संख्या ६७६, सही अंगठय़ाच्या पडताळणीत पात्र महिलांची संख्या ५७१, पात्र महिलांच्या संख्येची टक्केवारी ५७.७९ टक्के होती. मतदानासाठी निवेदनातील महिलांची स्वाक्षरी, अंगठा निशानीच्या अधिप्रमाणतेची टक्केवारी २५ टक्के एवढी होती. संघटीत महिलाशक्ती गावाचे चित्र पालटू शकते हे सालेभाटा येथील महिलांच्या आंदोलनातून सिद्ध झाले. 
२0 ते२२ गावांचे केंद्र असलेल्या सालेभाटा येथे गावाच्या मध्यभागी चौकात देशी दारु विक्रीचे दुकान होते, त्यामुळे या चौकाला दारुभट्टी चौक असे नाव मिळाले होते. आता दारु दुकान बंद झाल्यामुळे चौकाचे नामकरण करण्याचा निश्‍चय महिलाशक्ती दारुबंदी संघर्ष समितीने केला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या आदेशानुसार २४ फेब्रुवारीला सालेभाटा येथील परवानाप्राप्त देशी दारुचे दुकान व बिअर बार बंद करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून दुकान बंद केले. तत्पूर्वी सालेभाटा येथे २१ फेब्रुवारीला महिला मतदाराचे मतदान घेण्यात आले होते. गावातील ९८८ महिला मतदारांपैकी ७२८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये ६८५ महिला मतदारांनी आडव्या बाटलीला तर ३0 मतदारांनी उभ्या बाटलीला मतदान केले. १३ मत अवैध ठरली. बाजार समितीचे माजी संचालक व ग्रामपंचायत सदस्य कैलाश भगत यांच्या पुढाकाराने २0 ऑगस्ट २0१५ ला विशेष महिला ग्रामसभा घेऊन व त्यात दारुबंदीचा ठराव घेऊन या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. महिला बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील महिला मंडळांना सोबत घेऊन सुरु झालेल्या आंदोलनात ओमप्रकाश पटले, देवराम शेंडे, नरेश बोपचे, विनोद रहांगडाले यांनी सक्रीय सहभाग दिला.