आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणे रसिकांना भुरळ घालणार!

0
3

मुंबई : सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित  होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ तसेच सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या गाण्यांना ज्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याच पद्धतीने या गाण्यालाही अपेक्षेहून जबरदस्त प्रतिसाद पहायला मिळणार असल्याचे रसिकांच्या प्रतिसादावरून जाणवू लागले आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर आणि गाणी जोरदार धुमाकूळ घालत आहेत.

‘छापा काटा’ चित्रपट ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत करत असून  चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. आपल्या लोकप्रिय पहाडी आवाजाच्या शैलीत आदर्श शिंदे यांनी या गाण्याचे गायन केले आहे. तसेच ‘छापा काटा’ गाण्याचे संगीत दिग्दर्शन गौरव चाटी यांनी केले असून शब्द शिवम बारपांडे यांनी दिले आहेत.

“उत्तम कलाकारांची उत्तम कलाकृती रसिकांपर्यंत उत्तमरित्या पोहचवताना आम्हाला नेहमीच आनंद होतो, मात्र यावेळी ‘छापा काटा’ला मिळणाऱ्या प्रतिसादाचा आनंद हा अद्वितीय आहे. गाण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण चित्रपटही तेवढाच आवडेल अशी अपेक्षा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.