दिव्यांग शिबिरात दिव्यांगाचीच हेळसांड

0
9

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.3 -अपंग वित्त विकास महामंडळाअंतर्गत दिव्यांग स्वावलंबन शिबिर ३० जुलै रोजी स्थानिक सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आले होते. शिबिराची वेळ ही सकाळी अकराची होती. त्या आधीच २ हजारांवर दिव्यांग शिबिरस्थळी हजर झाले.परंतु ज्यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या दिव्यागांचीच हेळसांड या शिबिरात करण्यात आली.ज्यांच्या नावावर राजकारण करण्यासाठी खटाटोप करणारे शिबिराचे उदघाटक असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्रीच थेट सायंकाळी साडेचारला पोचले. यावरून त्यांना दिव्यांग पाल्यांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते. शिबिरस्थळी असुविधांचा फटकाही दिव्यांगांना बसला.त्याचा निषेध म्हणून या दिव्यांगानी काळ्या फिती लावून आपल्या भावना व्यक्त केल्य़ाचे आकाश मेश्राम,दिनेश पटले,चंद्रशेखर कुंभरे,सागर बोपचे,सविता चौधरी,राखी चुटे यांनी सांगितले.
हिरमूसलेले चेहरे घेऊन दूरवरून आलेले हे दिव्यांग सायंकाळी परत आपल्या घरी निराशाने गेले.काही दिव्यांगानी दिलेल्या माहितीनुसार सडक अर्जुनी येथे आयोजित शिबिरातही थट्टा करण्यात आली.बसस्थानकापासून दीड किलोमीटर दिव्यांग्यांना त्रास सहन करत जावे लागले परंतु छायाचित्र काढून आपली स्तुती करवून घेणार्या पालकमंत्र्यासह जिल्ह्याधिकार्ंयानाही आमची दया आली नाही असे सांगत यांच्याकडून काय अपेक्षा असे विचार दिव्यांगाच्या मनात घर करुन बसले आहे.
अपंगांची सेवा हीच ईश्वर सेवा. ही सेवा करून मी धन्य झालो, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आपल्याच जिल्ह्यात आहेत. परंतु, केवळ शिबिरापुरते, कार्यक्रमापुरते त्यांचे हे मत असते. कार्यक्रम आटोपले की, त्यांना बोललेल्या शब्दांचा विसर पडतो. हे तितकेच सत्य आहे. असेच एक दिव्यांग स्वावलंबन शिबिर येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात ३० जुलैला आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र, तपासणी, रेल्वे पास यासारखे कागदपत्रे तयार करून मिळणार होती. शिबिराची वेळ ही सकाळी अकराची ठरली होती. त्या आधीच जवळपास २ हजारांवर दिव्यांग शिबिरस्थळी उपस्थित झाले. मात्र, शिबिरात पोहोचताच दिव्यांगांना पहिला फटका असुविधांचा बसला. नियोजनाचा अभाव ही डोकेदुखी ठरली. वरिष्ठ अधिकाèयांचे कोणतेही नियंत्रण नव्हते. तपासणी करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू जागेवर नव्हती. रेल्वे पास वाटप करणारे स्टॉल कुठेही दृष्टीस पडले नाही. व्हील चेअरची सुविधा नसल्यामुळे दिव्यांगांसोबत आलेल्या त्याच्या सहकाèयाला किंवा पालकाला दिव्यांगांना खांद्यावर मांडून शिबिरस्थळी पोहोचवावे लागले. पिण्याच्या पाण्याची सोय तर, सोडाच साधा ग्लासदेखील नसल्याने कोरडा घसा घेऊन दिव्यांगांना राहावे लागले. असे असतानाही शरीराने व्यंग असलेले दिव्यांग शिबिरस्थळी आपल्याला प्रमाणपत्र, रेल्वेपास आणि काही योजनांची माहिती मिळेल म्हणून, आतुरतेने वाट पाहात होते.
मात्र, यात काहीच साध्य झाले नाही. जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले ना. राजकुमार बडोले हे देखील सायंकाळी साडेचारला शिबिरस्थळी हजर झाले. त्यांनी दिव्यांगांना स्फुर्ती मिळेल, असे भाषण ठोकले आणि निघून गेले. मात्र, या भाषणातून काय साध्य होईल, असा प्रश्न पडतो. भाषण, आश्वासने खूप झालीत, कृती करा, आम्हाला दया नको, संधी द्या असा सूरही शिबिरात आलेल्या दिव्यांगांमधून उमटला.