मुख्यमंत्र्यानीही केला अवयव दानाचा संकल्प

0
12

मुंबई,दि.30- अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळाला पाहिजे. अवयवदात्याची गरज असलेले मोठ्या प्रमाणात रुग्ण असून प्रत्येकाने अवयवदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन स्वत:ही अवयवदानाचा संकल्प केला. आज नरिमन पाँईट, मरीन ड्राईव्ह येथे आयोजित महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत,पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आदि उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, डोळे, किडनी, यकृत, फुप्फुस, त्वचा हे अवयव आपण दान करु शकतो. आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करुन अंध व्यक्तीच्या जीवनात नवा प्रकाश देऊ शकतो. या अवयवदानाचे महत्त्व घराघरांत पोहोचले पाहिजे. आज येथे उपस्थित सर्व मंत्री, डॉक्टर्स यांनी आणि मी स्वत: अवयवदानाचा संकल्प केला आहे. आपणही सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा. महाजन यांनी प्रास्ताविकातून या अवयवदान मोहिमेची संकल्पना सांगितली. ते म्हणाले की, भारतामध्ये अवयवदानाच्या प्रतिक्षेत हजारो रुग्ण आहेत. त्यांना जर अवयव मिळाले तर त्यांचे आयुष्य सुंदर होणार आहे. अवयवदान करुन आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो. या अवयवदानाचे महत्त्व सर्वांना कळावे, स्वत:हून अवयवदान करण्यासाठी पुढे यावे म्हणून हे अभियान राज्यभर राबविले जात आहे. आपण सर्वांनी अवयवदानाचे महत्त्व समजून हा संदेश समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवावा.
डॉ. सावंत यावेळी म्हणाले की, समाजाची गरज ओळखून राज्य शासनामार्फत हे महाअवयवदान अभियान २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. किडनीबाबत काही गैरप्रकार घडत असून हे टाळण्यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करीत आहोत. ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव गरजू रुग्णांना त्वरीत मिळावेत. यातील कालावधी कमी व्हावा म्हणून आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
या महाअवयवदान अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. या रॅलीत अवयवदानाचे महत्त्व सांगणारे शेकडो फलक हातात घेऊन विद्यार्थी, डॉक्टर्स, नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.