आरती करून चढविला हार, सीटीस्कॅनची तेरवी! युवा स्वाभिमानचा एल्गार

0
15

आरोग्य विभागाच्या विरोधातकर्मचाºयांना वाटला प्रसाद
गोंदिया berartimes.com दि.९- शासकीय मेडीकल कॉलेजच्या अधिनस्त असलेल्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील सीटीस्कॅन मागील सहा महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे गरीबांचा जीव धोक्यात आला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागविण्यासाठी युवा स्वाभिमानने चक्क सीटीस्कॅनची बुधवारला (ता.८) तेरवी केली. सीटीस्कॅन विभागाच्या दाराला हार चढविला. आरती करून रूग्णालयातील कर्मचारी तथा इतर नागरिकांना प्रसादही वाटला.
बुधवारला युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बँडच्या आवाजात रूग्णालय गाठले. मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या सीटीस्कॅन विभागाच्या दारासमोर उभे राहून ‘जय देवी जय देवी, सीटीस्कॅन माता गरीबांच्या सेवेसाठी सुरू हो आता’ अशा आवाजात आरती करून सीटीस्कॅनच्या दारावर हार चढविला. दरम्यान निद्रीस्त असलेले आरोग्य विभाग आणि दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाचा नारेबाजीतून निषेध केला. यावेळी रूग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर युवा स्वाभिमानचा मोर्चा मेडीकल कॉलेजचे डीन केवलिया यांच्या कॅबीनकडे वळला. समस्येचा आढावा घेण्यासाठी युवा स्वाभिमान पदाधिकारी डीनला भेटायला गेले. मात्र, ते उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या दारावर हार लावला. विशेष म्हणजे सीटीस्कॅनची आरती झाल्यानंतर रूग्णालयात उपस्थित कर्मचाºयांना तथा नागरिकांना कार्यकर्त्यांनी प्रसाद वाटला. अनेक महिन्यांपासून सीटीस्कॅन मृत्यूशयेवर असल्याने तेरवी करून युवा स्वाभिमानने प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान यानंतरही प्रशासनाने सीटीस्कॅन सुरू केले नाही तर तीव्र आंदोलनासह मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे भंडारा-गोंदिया समन्वयक जीवन लंजे, युवा स्वाभिमानचे महासचिव जीवन शरणागत, सुनिल साठवणे, राजु भांडारकर, मनुताई उईके, बाबा टेंभरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमानचे हे आगळे-वेगळे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले.