पोलीस निरीक्षकासह नऊ पोलीस निलंबित

0
18

तुमसर berartimes.com दि.९-: तुमसर येथे ३0 जानेवारी रोजी हेमंत रामरतन उके (३४) रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यात ५ आरोपींना अटक करण्यात आली. यातील एका आरोपीचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने चक्क पोलीस कोठडीत वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे पोलीस निरीक्षकासह ९ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. संतोष डहाट, अमन मेश्राम, कैलास साठवणे, निशिकांत राऊत, प्रशांत गभणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. ८ फेब्रुवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर करायचे होते. आरोपी प्रशांत गभणे याचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने आरोपींनी तैनात पोलीसरक्षक व शिपाई यांच्या मदतीने सकाळी ९ वाजता पोलीस कोठडीत वाढदिवस साजरा केला.आरोपींनी वाढदिवसाचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर अपलोड केले. त्यामुळे छायाचित्र व्हायरल झाले. या प्रकरणात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांच्यासह ५ पोलिसांसह ४ भंडारा पोलीस मुख्यालयातील रक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.