पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वॉटर हिरो’ पुरस्कार

0
13

मुंबई दि.25: शुद्ध पाण्यासाठी काम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांचा आज ॲक्वागार्ड आणि नेटवर्क १८ यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वॉटर हिरो’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित या ‘जलदान’ कार्यक्रमास चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक, प्रसून जोशी, राधाकृष्ण नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बन्ने सिंग (राजस्थान), नसीम शेख (मुंबई), पर्वतसिंग (मध्यप्रदेश), चन्नागौडा पाटील (कर्नाटक), रमणदीप सिंग (चंदिगड), करुणाकरा रेड्डी (हैद्राबाद), रुखसाना हुसैन (मुंबई), सुहासिनी सिंग (नवी दिल्ली) यांच्यासह द हंस फाऊंडेशन यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वॉटर हिरो पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अशुद्ध पाणी पिल्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. याशिवाय या आजारांवरील उपचारांसाठी मोठा वैद्यकीय खर्चही होतो. त्यामुळे शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची चळवळ गतिमान होणे गरजेचे असून ही आता काळाची गरज झाली आहे. पाण्याची टंचाई किंवा पाण्याची अशुद्धता यास मनुष्य स्वत: कारणीभूत आहे. ही निसर्गनिर्मित समस्या नसून मानवनिर्मित समस्या आहे. त्यामुळे या समस्येचे निराकरण करणे अशक्य नसून सर्वांच्या सहभागातून पाणी टंचाई संपविण्याबरोबरच शुद्ध पाण्याची चळवळ सुद्धा गतिमान करता येऊ शकेल, असे ते म्हणाले.