नक्षल कमांडरच्या आजारी मुलाच्या उपचाराची पोलिसांनी केली व्यवस्था

0
8

गडचिरोली,दि.23(berartimes.com): ग्रामभेटीदरम्यान नक्षल उपकमांडचा मुलगा आजारी असल्याचे कळताच पोलिसांनी कुठलाही पूर्वग्रह न बाळगता त्यास दवाखान्यात भरती करुन उपचाराची व्यवस्था केली. नक्षलवाद्याच्या मुलावर मायेच्या ओलाव्याचा शिडकावा केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

पोलिसांनी माणुसकीचा परिचय देत एका नक्षल कमांडरच्या मुलावर योग्य उपचार करुन त्याचे प्राण वाचविण्याची जबाबदारी घेतल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. नक्षल दलममध्ये भरती झालेल्या सदस्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागते. त्यामुळे नक्षल्यांनी दलम सोडून मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

पोलिस प्रशासनातर्फे ग्रामभेटीचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विविध गावांना भेटी देऊन पोलिस अधिकारी गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतात. त्या समस्या संबंधित विभागाकडे पाठवून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. धानोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके हे नुकतेच नक्षलविरोधी अभियानादरम्यान सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत मरकेगाव येथे गेले होते. त्यांनी गावकऱ्यांशी त्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. चर्चेदरम्यान प्रदीप रैनू दुगा हा ७ वर्षाचा मुलगा अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता, प्रदीप दुगा हा टिपागड दलमचा उपकमांडर पंकज उर्फ रैनू बहादूर दुगा याचा मुलगा असल्याचे समजले. मात्र नक्षल दलमच्या उपकमांडरचा मुलगा असल्याबाबत मनात कुठलाही किंतु-परंतु न ठेवता श्री.टिके यांनी प्रदीपला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला सिकलसेल हा आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आता प्रदीपवर पुढील उपचार सुरु आहेत.