रामटेकजवळील मनसर टेकडीवर उत्खननात आढळले नागार्जुनाचे अवशेष

0
17

नागपूर,दि.20 : उपराजधानीपासून जवळच असलेल्या रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणावर बौद्धकालीन अवशेष सापडले आहेत. आतापर्यंत जवळपास २७६६ बुद्धकालीन मूर्ती उत्खननात सापडल्या असून दगडाने तयार करण्यात आलेले तीन स्तूप आढळले आहेत. इतकेच नव्हे तर स्तूपातील एका छोट्या खोलीत डोके नसलेली मूर्ती तसेच अवशेष आढळले आहेत. ही मूर्ती व अवशेष नागार्जुन यांच्या आहेत, अशी माहिती बोधिसत्त्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली. इंदोरा बौद्ध विहार येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
मनसर टेकडीवर असलेल्या तलावाखाली उत्खनन केल्यास बौद्धकालीन स्तूप असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. येथील उत्खनन सध्या बंद पडले आहे. आणखी ५० फूट खोल उत्खनन केल्यास तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी मिळतील, असे पुरातत्त्व विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी ए. के. शर्मा यांनी सांगितल्याचा हवाला देत येथील उत्खनन पुन्हा सुरूकरावे, अशी मागणी सुद्धा भदंत ससाई यांनी यावेळी केली. भदंत ससाई यांनी सांगितले, बोधिसत्त्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्रातर्फे १९९२ मध्ये उत्खननाला सुरुवात झाली. मनसर टेकडीवर एकेकाळी बौद्धकालीन विद्यापीठ होते. येथे बौद्धकालीन अवशेष आजही आहेत. त्यामुळे येथे उत्खनन करण्यात यावे, अशी विनंती पुरातत्त्व विभागाला करण्यात आली होती. परंतु त्यावेळी त्यांना यावर विश्वास बसला नाही. रामटेकचे तत्कालीन खासदार तेजसिंगराव भोसले व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुनसिंग यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यांनी उत्खननाला मंजुरी दिली. पुरातत्त्व विभागाच्या चमूंनी दोन वर्षे उत्खनन केल्यानंतर आपण स्वखर्चाने उत्खनन केले. पहिल्यांदा झालेल्या उत्खननात टेकडीवर तीन स्तूप आढळले. स्तूपाच्या खाली महापुरुषांचे अवशेष आणि त्याखाली बौद्धकालीन मूर्ती, सातवाहनकालीन शिलालेख मिळाले. दुसºयांदा झालेल्या उत्खननात बौद्ध विद्यापीठ आढळले. या विद्यापीठात बौद्ध भिक्खुंना धम्म आणि सदाचाराची शिकवण दिली जात होती. संपूर्ण उत्खनन जवळपास नऊ वर्षे चालले. इंग्रजांनी १७ नोव्हेंबर १९०६ ला राष्ट्रीय स्वरक्षित स्मारक म्हणून मनसर टेकडी घोषित केली होती, असेही भदंत ससाई यांनी सांगितले.