शहीद मिलिंद खैरनार यांना अंतिम निरोप

0
20
नंदुरबार,,दि.13- जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत वायुदलाचे शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव असलेल्या बोराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वायुदलाच्या जवानांनी हवेत २१ फैरी झाडून मानवंदना दिली. शहीद खैरनार यांच्या अंत्यसंस्काराला साक्री, दहीवेल तसेच नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे १० हजार नागरिक उपस्थित होते. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला. शहीद मिलिंद यांच्या आई सुनंदा खैरनार यांना भावना अनावर झाल्या. “मिलिंद आमच्यासाठी जन्माला आलाच नव्हता. तो देशाचा हिरा होता. तो आला आणि चमकून निघून गेला. त्याने देशाची सेवा केली…’ अशा शब्दांत वीरमातेने भावना व्यक्त केल्या.

अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत मिलिं खैरनार यांना आले वीरमरण…

काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे २ गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात २७ वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले आहेत. याआधी २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यात एक गरुड कमांडो शहीद झाला होता.