बराक ओबामांना ‘पंढरपूरच्या वारी’चे दर्शन !

0
28

नवी दिल्ली – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुख्मिणीच्या दर्शनाला दरवर्षी देश- विदेशातून लाखो भाविक येत असतात. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही विठूरायाचे व त्याच्या वारीचे दर्शन घडण्याचा योग येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथवर महाराष्ट्रासह १६ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २५ चित्ररथांचे संचलन होणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती यांनी दिली. त्यात महाराष्ट्रातर्फे ‘पंढरीची वारी’ हा चित्ररथ असेल. येणार आहे. त्याची बांधणी पूर्ण झाली असून सहभागी कलाकारांनी कसून सरावही केला. यंदा प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख अतिथी आहेत. त्यांनाही पंढरीचा भक्तीसोहळा अनुभवता येईल.

चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली आहे. तर ६५ कारागिरांनी देखणा चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री दाखवण्यात आली आहे. मध्यभागी विठ्ठल रखुमाई मंदिर असून अश्वांचे रिंगणही आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत. तर दोन्ही बाजूला पालखी, पताका, टाळ, मृदंग, वीणेसह वारीत सहभागी १३० वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत. या चित्ररथावर `विठ्ठल विठ्ठल, तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली…’ या गीतावर टाळ, मृदंग, वीणेच्या गजरात वारकऱ्यांच्या पाऊल्या सादर होणार आहेत. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ कलाकारांची चमू सादरीकरण करणार आहे.

१६ राज्यांचे होणार पथसंचलन
२५ रथ संचलनात सहभागी
६५ कारागिरांनी उभारला रथ
१३० वारकऱ्यांच्या प्रतिकृती