ज्येष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर यांचे निधन

0
23

मुंबई, दि. २५ – मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे हातकणंगलेकर यांनी मराठी आणि इंग्रजीत एकूण १५ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले होते.
मराठी साहित्यामध्ये हातकणंगलेकर हे समीक्षक म्हणून ओळखले जात असले तरी समीक्षा म्हणजे जड, कठीण आणि सर्वसामान्य वाचकांच्या पलीकडचे असते हा समज त्यांनी मोडून काढला होता. समीक्षक म्हणजे टीकाकार हा प्रचलित समज मोडून नवनवीन साहित्यांचे हातकणंगलेकर यांनी नेहमीच स्वागत केले. १ फेब्रुवारी १९२७ मध्ये कोल्हापूरमधील हातकणंगले येथे त्यांचा जन्म झाला. उच्चशिक्षण घेतल्यावरही हातकणंगलेकर मोठ्या शहरांची वाट न धरता ग्रामीण भागातच राहणे पसंत केले. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९७४ म्ध्ये आदर्श प्राध्यापक हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. २००८ मध्ये सांगलीत पार पडलेल्या ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.