सहा हजार बंधाऱ्यासाठी ६०० कोटींची तरतूद- जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

0
13

भंडारा : सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून राज्यभरात सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, असे सांगून सहा हजार नवीन बंधाऱ्यासाठी ६०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पासह काही उपसा सिंचन योजनेची पाहणी केल्याचे सांगून ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या नवीन मागण्या पूर्ण केल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गोसीखुर्द धरणानजीक जलविद्युत प्रकल्पाचे काम संथगतीने असले, तरी कामाची गती वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अत्यल्प दराने वीज उपलब्ध होऊ शकेल. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात सातही तालुक्यांना भेटी देऊन तालुकानिहाय कामाचा आढावा घेतला असता अनेक समस्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. मागील आघाडी शासनाच्या काळात मनमानी पद्धतीने कामाचे वाटप करण्यात आले होते. याची सखोल चौकशी सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलाव व इतर लघु योजनांच्या दुरूस्तीसाठी तत्कालीन सरकारने निधी दिला नाही. मात्र युती शासन या तलावाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी धडक मोहीम राबविणार आहे. आमदार-खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून निधी देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. याचे अनुकूल निकाल हाती येतील आणि राज्यभरातील सुमारे १३.५ लाख हेक्टर एकरात सिंचन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, जिल्हा उपप्रमुख प्रशांत लांजेवार, सुनील कुरंजेकर व पदाधिकारी उपस्थित होते.