आदिवासींच्या आरक्षणावरील आक्रमण खपवून घेणार नाही- आदिवासी विकास मंत्री सवरा

0
11

राष्ट्रीय कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाचे उदघाटन
गोंदिया,दि.२ : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजना राबविण्यामागचा उद्देश आदिवासी बांधव विकासाच्या प्रवाहात यावा हा आहे. अलिकडेच काहिंनी आदिवासीमध्ये आपल्या जातीचा समावेश करण्यात यावा ही मागणी केली आहे. आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही. मात्र आदिवासींच्या आरक्षणातून इतर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्यात येत असतील तर हे आक्रमण आम्ही खपवून घेणार नाही. असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केले.
आज (ता.२) सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेनिमीत्त आयोजित राष्ट्रीय कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाचे उदघाटन करतांना श्री.सवरा बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते हे होते. तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आमदार संजय पुराम, जि.प.समाज कल्याण समिती सभापती कुसन घासले, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची उपस्थिती होती.
श्री. सवरा पुढे म्हणाले, आदिवासी युवकांचे कल्याण झाले पाहिजे यासाठी शासनाने त्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्याला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासींसाठी मिळणारा निधी हा त्यांच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. आदिवासी समाजाच्या भावना कचारगडशी जुळलेल्या आहेत. त्यासाठी तेथील विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारने सुद्धा आदिवासीच्या सर्वांगिण कल्याणासाठी ध्यास घेतला असल्याचे श्री. सवरा म्हणाले.
विशेष अतिथी म्हणून बोलतांना बडोले म्हणाले, आदिवासी समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आदिवासी बांधव दुर्गम भागात राहत असल्यामुळे अनेक प्रकारच्या मुलभूत सुविधांपासूना वंचित राहावे लागत आहे. दुर्गम भागाचा विकास करुन आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शासनाचा आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात आदिवासींचे मागासलेपण दूर करण्यासाठी नियोजनात्मक काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चांगले शिक्षण, आरोग्य मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.कचारगडच्या विकासासाठी कामे सुरु करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, लवकरच ५ कोटी रुपयाचा निधी कचारगडच्या विविध विकास कामांसाठी मिळणार आहे. कचारगडच्या विकासाचे व्हिजन डॉक्यूमेंट तयार करुन पाच वर्षात येथील सर्व विकासकामे करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, आदिवासींचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आदिवासी युवकांकडे आधी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विकास प्रक्रियेत आदिवासी युवकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. युवकांनी चांगले शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे व मोठ्या पदावर जावून समाजाच्या विकासाला हातभार लावावा अशी अपेक्षाही श्री. आत्राम यांनी व्यक्ती केली. शिक्षण हे महत्वाचे हत्यार असून या हत्याराचा वापर आदिवासी बांधवांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा. कचारगडच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री. आत्राम यांनी सांगितले.अध्यक्षस्थानावरुन बोलतांना खासदार नेते म्हणाले, देशातील आदिवासी बांधव मोठ्या भक्तीभावाने कचारगडला येतात. त्यांना येथे मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. कचारगडच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय पुराम म्हणाले, कचारगड हे देशातील आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थळ आहे. देशातील लाखो आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने येथे येतात. त्यामुळे त्यांच्या निवासाच्या दृष्टीने येथे भविष्यात भक्त निवास बांधण्यात येईल. कचारगडच्या सर्वांगिण विकासाकडे या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या जमाकुडो शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथील विद्यार्थीनी अनिता मडावी हिचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. मुलींनी आदिवासी गोंडी नृत्य सादर केले. कार्यक्रमाला विविध राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद काकोडे यांनी केले.