वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सहानुभूतीचा दृष्टीकोन-केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री जावडेकर

0
8

मुंबई- वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत असून या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने काही प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार त्यावर सहानुभूतीने विचार करेल व रास्त मागणी मान्य करेल, असे केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी सांगितले.भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश किसान मोर्चाच्या बैठकीत मुंबईत ते बोलत होते. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी मा. जावडेकर यांचे स्वागत केले.

मा. प्रकाश जावडेकर म्हणाले की, हत्ती, रानडुकरे, माकडे इत्यादी वन्यप्राण्यांमुळे राज्यातील शेतीचे नुकसान होते व शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो याबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटते. शेतकऱ्याचे हे नुकसान रोखण्यासाठी व या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे काही प्रस्ताव पाठवला तर केंद्र सरकार त्यावर सहानुभूतीने विचार करेल.

त्यांनी सांगितले की, राज्यात शेतीच्या विकासासाठी पाण्याची साठवणूक करणे व भूमिगत जलपातळी वाढविण्यासाठी बंधारे बांधण्यासह विविध उपायांची गरज आहे. त्याविषयीच्या प्रस्तावांच्या मंजुरीत केंद्रीय पर्यावरण खात्याकडून काही अडचण येत असेल तर आपण त्या प्रश्नात स्वतः लक्ष घालू.

ज्ञानोबा मुंढे म्हणाले की, राज्यात भाजपाच्या सदस्य नोंदणीसाठी किसान मोर्चातर्फे व्यापक प्रयत्न चालू आहेत. मोर्चातर्फे अकरा लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल.

शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप द्यावेत आणि विदर्भातील मालगुजारी तलावातील गाळ काढावा या किसान मोर्चाच्या दोन्ही मागण्या मान्य केल्याबद्दलही त्यांनी भाजपा सरकारचे आभार मानले.

यावेळी मोर्चाचे उपाध्यक्ष वासुदेव काळे, चंद्रकांत गुंडावार, भाऊसाहेब गोरे, सरचिटणीस अशोक केंद्रे, चिटणीस केशव कामथे, पंडितराव आव्हाड व प्रशांत संख्ये व्यासपीठावर उपस्थित होते. मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तसेच ३० जिल्ह्यांचे अध्यक्ष बैठकीस हजर होते.