दोन वर्षानंतरही ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे रहस्य कायम

0
11

गोंदिया,दि.18: महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ वाघ बेपत्ता होऊन आज १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर संस्थांनी ‘जय’ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. ‘जय’चे काय झाले याविषयी कोणीही सांगू शकत नाही. ‘जय’चे बेपत्ता होण्यामागील रहस्य अद्यापही कायम आहे. त्यातच माजी खासदार नाना पटोले यांनी तर वनमंत्र्यासह वनविभागारच या वाघाच्या बेपत्ता होण्यामागे हात असल्याचे जाहिर आरोप केले होते.
जय गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील खापरी डोंगर महादेव पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये आला होता. तेव्हा तो अडीच ते तीन वर्षाचा होता. या जंगलाचा समावेश नंतर उमरेड पवनी करांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात करण्यात आला. काही दिवसातच ‘जय’ वाघ या अभयारण्याचा हिरो ठरला. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवस पर्यंत आॅनलाईन बुकींग चालत होती. शेकडो पर्यटकांना प्रतिक्षा यादीवर राहावे लागत होते. अनेक सेलीब्रीटींनीही ‘जय’ला पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाई, पाच फुट लांबी आदी गुणांनी जय हा पर्यटकांना येथे येण्यास भुरळ घालीत होता. अल्पावधीतच जय ने या अभयारण्याच्या व प्रादेशिक वन विभागाच्या जंगलावर आपले साम्राज्य निर्माण केले होते. अनेक मोठ्या वाघांना ‘जय’ने पळवून लावले होते. येथे ‘जय’चा एवढा दरारा होता की इतर कोणताही वाघ जय च्या धाकाने भटकत नव्हता.
जयच्या विविध गुणांमुळे तो भारतातील एक महत्वपूर्ण वाघ ठरला होता. कोणताही वाघ हा १०० चौरस किलोमिटर फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमिटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० किलोमिटर अशा २५० किलोमिटरच्या जंगलात मुक्तपणे फिरत होता. जय हा अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात आठ दिवस तर उमरेड भिवापूर कºहांडला जंगलात आठ दिवस राहात होता. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरली असतानाही जय नदी पोहून पलिकडे जात होता.
‘जय’ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभिड, ब्रम्हपुरी पर्यंतच्या जंगलात वाढविले होते. त्यामुळे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतील डॉ.बिलाल हबीब यांच्या नेतृत्वाखालील चमूने जय ला दोनदा रेडीओ आय डी कॉलर लावले होते. नागझिरा जंगलात माणसांना पाहून असणारा जय कोणालाही घाबरत नव्हता. माणसावर जय ने कधीही हल्ला केला नाही.त्या बेपत्ता जय चा शोध सीआयडी अद्यापही घेत आहे.