नक्षल्यांचा पुळका घेणाऱ्या संघटनांनी हल्ल्यातील शहीद पोलीस कुटुंबीयांचे दु:ख जाणले का ?

0
10

नागपूर,दि.27 : नक्षलवाद्यांचा पुळका घेणाऱ्या मानवाधिकार संघटनांनी कधी नक्षली हल्ल्यात शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांचे दु:ख जाणले आहे का? कुणाचा तरुण मुलगा, कुणाचा पती, भाऊ, बहीण नक्षलवाद्यांच्या हिंसक मोहिमेत शहीद झाले आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला दु:ख सहन करून आठवणीत जीवन जगावे लागत आहे. नक्षलवादामुळे वेदनांचा भार सहन करावा लागतो आहे. रक्तपात आम्हालाही नको आहे. मात्र नक्षलवाद्यांचा पुळका घेणाऱ्या मानवाधिकार संघटनांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित करून विकासाच्या प्रवाहात सहभागी करावे, असे आवाहन गडचिरोली येथील शहीद पोलीस कुटुंबीयांनी गुरुवारला श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केले.
गडचिरोली भागात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना शाश्वत बळ देण्यासाठी जानकी शहीद पोलीस परिवार विविध वस्तू आणि सेवा सहकारी संस्था, गडचिरोलीची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहीद पोलीस कुटुंबीयांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. या आठवड्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत ३९ नक्षलवादी ठार झाले. पोलीस दलातील सी-६० जवानांचे हे मोठे यश असून, गेल्या कित्येक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या कारवाईदरम्यान विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना ही एकप्रकारे श्रद्धांजली ठरली असल्याची भावना शहीद पोलीस कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेच्या अध्यक्षा व शहीद चंद्रशेखर वाघाडे यांच्या पत्नी हेमलता वाघाडे म्हणाल्या, नक्षलवादामुळे गडचिरोलीचा पूर्ण विकास खुंटला असून, आदिवासींना त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कापासून हिरावून घेत आहेत. शहरात नक्षलवादाला खतपाणी घालणाºयांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत, मात्र सामान्य आदिवासींच्या दारात अंधार आहे. आदिवासींच्या अल्पवयीन मुलामुलींना बळजबरीने घरातून उचलून दलामध्ये भरती करून घेतात. दलात मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात. त्यामुळे पोलिसांनी या आठवड्यात केलेली कारवाई योग्यच असल्याचे त्या म्हणाल्या. हे चित्र बदलायचे असेल तर नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मूळ प्रवाहात यायला हवे. यासाठी सरकार विविध योजना नक्षलवाद्यांसाठी योग्यप्रकारे राबवून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांचे पुनर्वसन करीत आहे. या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा. नक्षलवाद जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचा विकास होणार नाही, अशी भावना संस्थेच्या सचिव व शहीद अविनाश रणदिवे यांच्या पत्नी अल्का रणदिवे यांनी व्यक्त केले. यावेळी शहीद तुषार बंडेवार यांची आई रेणू बंडेवार, शहीद विलास मांदोडे यांच्या पत्नी संगीता मांदोडे, शहीद नुरुद्दीन हकीम यांचा भाऊ मेहराज, शहीद जवानांचे नातेवाईक पत्रपरिषदेत उपस्थित होते