ऐतिहासिक सामुदायीक विवाह सोहळ्यात १०२ जोडपी विवाहबध्द

0
16

 दोन नक्षल आत्मसमर्पित जोडप्यांचा सहभाग
– पोलिस अधीक्षक कार्यालय व मैत्री परिवार यांचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.२९ :- एक आगळा व ऐतिहासिक कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालय व मैत्री परिवार संस्था, धर्मदाय आयुक्त नागपूर व साईभक्त सेवा समिती नागपूरच्यावतीने गडचिरोली जिल्ह्यातील १०२ आदिवासी जोडप्यांचा सामुदायीक विवाह सोहळा आज २९ एप्रिल रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास खा. अशोक नेते, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ. हरि बालाजी, डॉ. शिवनाथ कुंभारे, धर्मदाय आयुक्त सातव, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, प्रा. प्रमोद पेडके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्थानिक इंदिरा गांधी चौकातून वाजत-गाजत १०२ जोडप्यांची वरात काढण्यात काढण्यात. त्यानंतर १० भागांमध्ये विभागीय पोलिस क्षेत्राप्रमाणे जोडप्यांना विवाह मंडपात नेऊन आदिवासी लोककला संस्कृतीप्रमाणे जोडप्यांचे लग्न अगदी शास्त्रशुध्द पध्दतीने लावण्यात आले. तसेच गोंडी बोलीभाषेत मंगलाष्टके लावून पुष्प उधळण करण्यात आली. यावेळी जोडप्यांच्या कुटुंबियांसह मैत्री परिवार संस्था, पोलिस अधीक्षक कार्यालय,  धर्मदाय आयुक्त नागपूर व साईभक्त सेवा संस्था नागपूरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोडप्यांना यावेळी मंगळसूत्र देण्यात आले. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही मान्यवरांच्या हस्ते नवविवाहीत जोडप्यांना वाटप करण्यात आले. शासनाच्यावतीने प्रत्येक जोडप्याला १० हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच ४५ हजार रूपयांचे अहेर व सायंकाळी सर्व विवाहित जोडप्यांना विवाह स्थळापासून वाजतगाजत मिरवणूक काढून आपल्या घरी पाठविण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सिंग म्हणाले, या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा आधार मिळालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवती नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडता लोकशाही मार्गाने पुढील वाटचाल करण्याची दिशा या कार्यक्रमाने दिली असल्याचे जिल्हाधिकारी सिंग म्हणाले.
विवाह सोहळ्याचे आयोजक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, मैत्री ग्रूप व जिल्हा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतीशी पोलिस विभागाचे नाते जुळून आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. नक्षल्यांच्या भूलथापांना बळी पडून जिल्ह्यातील युवक-युवती नक्षल चळवळीत सामील होवून आपले जीवन आजवर नरकात टाकीत होते. मात्र जिल्हा पोलिस विभागाने मागील काही वर्षापासून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता अनेक योजना राबविल्या. या योजनेतून अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग मिळेल, असेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले.
आत्मसमर्पित नक्षल जोडपे झाले विवाहबध्द
मागील अनेक वर्षांपासून नक्षल चळवळीत काम करीत असलेल्या सैनू झुरू वेळदा उर्फ मिरगू (३५) आणि रूपी कांडे नरोटी उर्फ झुरी (३६), अर्जुन बारसाय पोया उर्फ नरेश (२५) आणि छाया देवू कुळयेटी (२३) या नक्षल जोडप्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपले जीवन लोकशाहीच्या मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला होता. या आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसाठी आजचा सामुदायीक विवाह सोहळा संजीवनी ठरला आहे. या विवाह सोहळ्यात त्या आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. या माध्यमातून चळवळीत काम करीत असलेल्या नक्षली जोडप्यांना संदेश दिला आहे की, आपणही आत्मसमर्पण करून लोकशाहीच्या मार्गाने आपले जीवन जगावे.