शिक्षण हा माणुसकीचे बियाणे पेरणारा शेतकरी

0
25

तिल्ली-मोहगाव : / शिक्षण साहित्य संवाद कार्यक्रमाच्या मंचावरून ग्रामीण क्षेत्रातील समस्या व गरजा यांचा उहापोह व्हावा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा यातील प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे गरजेचे आहे.शिक्षक हा माणुसकीचे बियाणे पेरणारा शेतकरी होय, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
समूह साधन केंद्र मोहगाव-तिल्ली व सहयोग शिक्षक मंच गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. केंद्र शाळा मोहगाव येथे ‘शिक्षण साहित्य संवाद २0१५’ कार्यक्रम पार पडले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांनी केंद्रप्रमुख रघुपती अगडे व सहयोग शिक्षक मंच यांची वाहवा केली.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढीचे कार्य शिक्षकांच्या हाती आहे. आपले विद्यार्थी बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेत कधीही कमी पडणार नाहीत. अंधश्रद्धा व आळस हे प्रगतीचे अडसर आहेत. विज्ञाननिष्ठ व राष्ट्राभिमुख विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या हाती आहे. खरा शिक्षक शेवटपर्यंत जिज्ञासू विद्यार्थीच असतो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद््घाटन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व समिक्षक डॉ. अनिल नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. अतिथी म्हणून सेवानवृत्त शिक्षणाधिकारी सी.एम. बागडे, केंद्रप्रमुख आर.आर. अगडे, अशोक चेपटे उपस्थित होते.
अगडे यांनी समूह साधन केंद्राचा शैक्षणिक आढावा, मोहगावचे भौगोलिक स्थान, शिक्षकांचे व सहयोग मंचचे कार्य सांगितले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. नितनवरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोणावर भर दिला. द्वितीय सत्रात ‘साहित्यीकांची शिक्षण प्रक्रियेतील भूमिका व जबाबदार्‍या’ परिसंवाद प्रा.डॉ. गिरीष सपाटे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. नरेश आंबिलकर, प्रा. दिनेश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले.संचालन श्रीकांत कामडी यांनी केले. तृतीय सत्रात कवी व कथाकार प्रमोदकुमार अणेराव व लेखिका डॉ. संध्या पवार यांच्या मुलाखती युवराज माने व सचिन इलमकर यांनी घेतल्या. बालवयातच पितृछत्र हरविल्याने प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढत कविता व कथालेखन केल्याचे अणेराव यांनी सांगितले. तर २५ मुली दत्तक घेवून त्यांना स्वावलंबी बनविले व पालकमैत्री अभियानाची पार्श्‍वभूमी डॉ. संध्या पवार यांनी सांगितली.
चतुर्थ सत्रात कवी माणिक गेडाम यांच्या अध्यक्षतेत व युवराज गंगाराम यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. यात नूरजहा पठान, किशोर कवडे, सी.एम. बागडे, मीनाज पाचातोड, अशोक चेपटे, सचिन इलमकर, युवराज माने, रामेश्‍वर बागडे, फिरोजा खान, विष्णू राऊत, दिनेश अंबादे, सुभाष सोनवाने, शिवाजी बडे, राजेंद्र बन्सोड यांनी कविता सादर केल्या. यानंतर समारोपीय सत्र पार पडले. या वेळी मनोज ताजने, हिदायत शेख, जे.डी. जगनित व सरपंच एस.जी. पटले उपस्थित होते.
संचालन हेमराज शहारे यांनी तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख अगडे, एस.जे. बहेकार, अशोक चेपटे, युवराज माने, मुख्याध्यापक वाघमारे व शिक्षकांनी सहकार्य केले.