माफियांमुळंच सचिनला ‘भारतरत्न’!

0
8

वृत्तसंस्था
कानपूर-भारताचा विक्रमवीर क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिळालेल्या ‘भारतरत्न’चा वाद थांबायला तयार नाही. राजकीय नेते व समाजातील काही धुरिणांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर आता हॉकीपटू व माजी केंद्रीय मंत्री अस्लम शेरखान यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सचिनऐवजी हॉकीपटू ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवा होता. मात्र, देशातील उद्योगपती, माफिया आणि धनाढ्यांच्या पाठिंब्यामुळं सचिनला हा पुरस्कार मिळाला,’ असा स्पष्ट आरोप शेरखान यांनी केला आहे.

कानपूर येथील एका कार्यक्रमात हॉकीच्या दयनीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त करतानाच शेरखान यांनी क्रिकेटचे स्तोम माजवले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याच अनुषंगाने बोलताना त्यांनी ‘भारतरत्न’वर भाष्य केले. ‘ध्यानचंद गरीब असल्यामुळंच त्यांना ‘भारतरत्न’ मिळाला नाही. ‘क्रिकेट हा फक्त मुंबईचा खेळ आहे. पण तो श्रीमंतांचा आहे. बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’ या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत. त्यामुळं या देशात त्यांना मान आहे. स्पॉन्सर्सच्या पैशांवर सर्व कारभार चालतो. त्यांच्या इच्छेनंच अनेक निर्णय होतात. सचिनला ‘भारतरत्न’ही अशा लोकांच्या पाठिंब्यामुळंच मिळाला आहे,’ असं शेरखान म्हणाले.