वाघाला पाळीव प्राणी बनवा

0
14

भोपाळ – वाघ, सिंह या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी मध्यप्रदेश सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांने अजब मागणी केली आहे. या मंत्रिमहोदयांनी वाघ, सिंह या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.
मध्यप्रदेश सरकारमधील पशुसंवर्धन, उद्यान आणि अन्न प्रक्रिया मंत्री कुसूम मेहदेले यांनी अशी मागणी करणारा प्रस्ताव वनखात्याकडे पाठवला आहे. यासाठी मंत्रिमहोदयांनी अफ्रिकन आणि थायलंड या देशांची उदहारणे दिली आहेत.
अफ्रिका, थायलंड या देशात वाघ, सिंहांना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्याची कायदेशीर तरतुद असल्यामुळे या प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे. व्याघ्र संवर्धनासाठी देशात अनेक प्रकल्प आहेत. आतापर्यंत यावर कोटयावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र वाघांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ झालेली नाही असे या महिला मंत्र्यांनी म्हटले आहे.
अफ्रिका, थायलंड या देशात वाघ, सिंह पाळीव प्राणी बनल्याने त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुसूम मेहदेले यांनी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा प्रस्ताव राज्याचे वनमंत्री गौरीशंकर शेजवर यांना पाठवला आहे.
मध्यप्रदेशात बांधवगड, कन्हा, पन्ना, बोरी-सातपूरा, संजय-दुबरी आणि पेंच असे सहा व्य्राघ संवर्धन प्रकल्प असून, त्यात २५७ वाघ आहेत. २०१० मध्ये देशभरात वाघांची संख्या १,७०६ होती. २०१४ च्या गणनेनुसार आता ही संख्या २,२२६ झाली आहे.