काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची चिन्हं, प्रियांका सरचिटणीस, तर राहुल गांधी पक्षाध्यक्ष?

0
9

नवी दिल्ली: देशभरातील निवडणुकांमध्ये हाराकिरी झाल्यानंतर, काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी लवकरच काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.

सध्या दिल्लीत प्रियांका गांधींना राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याबाबत चर्चा सुरू आहेत.खुद्द राहुल गांधीच गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रियांका गांधींना पक्षामध्ये आणण्याची मागणी करत होते. राहुल गांधी स्वत: पक्षाध्यक्ष आणि प्रियांका गांधींना पक्षाचा चेहरा बनवू इच्छित आहेत. तसंच राहुल गांधींना सरकारमध्ये न राहता पक्ष संगठनेत काम करायला आवडतं हे सुद्धा तितकंच खरं आहे.

काँग्रेसमध्ये प्रियांका गांधींना लवकरात लवकर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस करण्याची मागणी वाढत आहे.राहुल गांधी सध्या सुट्टीवर आहेत. पण ते नेमके कुठे आहेत, याची चर्चा सर्वत्र आहे. ते भारतात आहेत की विदेशात याचे अंदाज लावले जात असतानाच, राहुल गांधी रविवारी दिल्लीत परतणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. तसंच ते अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही हजेरी लावण्याचे संकेत आहेत.

राहुल गांधी सुट्टीवर गेल्यामुळे त्यांच्याबद्दलचं मत नकारात्मक होऊ नये, यासाठी ते सुट्टी मधूनच सोडून येण्याची शक्यता आहे. राहुल यांच्या सुट्टीमुळे खुद्द गांधी परिवारही टेन्शनमध्ये आहे.
सूत्रांच्या मते, राहुल गांधी एक एप्रिलला एआयसीसीच्या बैठकपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करू शकतात. अनेक सदस्यांना कार्यकारिणीतून हटवून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.नव्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या शर्यतीत पी सी चाको सर्वात पुढे आहेत.