स्वाइन फ्लू उपचारांचा खर्च सरकार उचलणार – मुख्यमंत्री

0
21

मुंबई – महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वेगाने वाढ होत असून बळींचा आकडाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी स्वाइन फ्लूमुळे आणखी १२ जण दगावले. राज्यातील एकूण बळींचा कडा १४३ वर पोहोचला आहे. याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पुढे ते म्हणाले, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांतील रुग्णांची संख्या घटत असून लातूर विभागात मात्र रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईसह राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून हे वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढील १५ दिवस हे आमच्यासाठी आव्हानात्मक असतील. राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे वैयक्तिकपणे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, साथ रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यावर विरोधकांनी टीका करण्याऐवजी सरकारला साथ देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

संशयितांवर त्वरित उपचारांचे खासगी रुग्णालयांना आदेश
– स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना त्वरित दाखल करून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना दिले.
– खासगी जिल्हा रुग्णालयांत रुग्णांवरील उपचार डिस्चार्जनंतरचाही खर्च हा राज्य सरकार उचलेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
आरोग्यमंत्रीडॉ. दीपक सावंत यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यातील स्वाइन फ्लूची स्थिती आटोक्यात येईपर्यंत रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
लक्षणे
१०१ अंशांवर ताप, थकवा, छातीत दुखणे, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, डोकेदुखी, शिंका, सर्दी, खोकला, घसा- अंगदुखी, ताप. तज्ज्ञांच्या मते, लक्षणांनंतर साधा ताप ३-४ दिवसांत येतो.याउलट स्वाइन फ्लू झाल्याच्या ३-४ तासांत प्रकृती बिघडते.