वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून परिवर्तनासाठी शेतकऱ्यांनीही सहभाग घ्यावा- मुख्यमंत्री

0
11

नांदेड : शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना बनवून परिवर्तन घडवण्यास सरकारने सुरुवात केली आहे. या परिवर्तनासाठी शेतकऱ्यांनीही सहभाग दिला, तर निश्चितच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हदगाव तालुक्यातील ल्याहरी येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ ते परभणी दौऱ्याच्या प्रवासात त्यांनी आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ल्याहरी गाव शिवारात जलयुक्त शिवार अभियानातील शेततळ्याच्या कामाचे उद्घाटन केले. याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे राज्यातील 5 हजार गावे, एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराचा आणि राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार कुठेही मागे राहणार नाही, याचा मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्दात पुनरुच्चार केला. पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यात साडेचार हजार कोटी रुपयांची मदत थेट जमा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, गेले दोन दिवस अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचीही पाहणी करत आहे. शेतकरी अडचणीत आहे. गेली तीन-चार वर्षे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मदत करण्याची सरकारने भूमिका घेतली आहे. गेल्या दहा वर्षात जितका निधी शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून दिला गेला नाही, त्याहून अधिक निधी मदत म्हणून शेतकऱ्यांना दिला आहे. संकट मोठे आहे. त्यामुळे फुल नाही, पण फुलाची पाकळी या भावनेतून मदतीद्वारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानाबाबतही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाद्वारे शेतीसह, गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव पाण्यासाठी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गावातील पाणी त्याच गावात अडवण्यासाठी विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. एका वर्षात पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न या अभियानाद्वारे केला जात आहे. या अभियानासाठी यापुर्वीच पुरेसा निधी दिला आहे. यापुढेही अभियानाकरिता अधिकचा निधीही उपलब्ध करून देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन या पिकांसाठीचा प्रक्रिया उद्योग उभे करणे आणि या पिकांच्या लागवडीचा खर्च कमी कसा करता येईल यासाठीचे संशोधन अशा दोन्ही गोष्टींवर भर देण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताकरिता राज्य सरकारने गेल्या तीन महिन्यात सात हजार कोटींचे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कुठे मागे राहणार नाही. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी आखण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग द्यावा. यामुळे निश्चितच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मेळाव्‍यात मुख्‍यमंत्र्यांनी विविध ठिकाणाहून आलेल्‍या शेतकरी शिष्‍टमंडळ तसेच मान्‍यवर आदींची निवेदने स्विकारली.

तत्पूर्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ल्याहरी शिवारातील कृषी विभागातर्फे सुरु करण्यात येणाऱ्या शेततळ्याच्या कामाचे उद्घाटन, यंत्रसामग्रीचे पूजन आणि भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, विभागीय महसूल आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, प्रधान सचिव प्रविण परदेशी, जिल्हाधिकारी धीरज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कृषी अधीक्षक संजय पडवळ, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगांवकर, माजी राज्यमंत्री डॉ.माधवराव पाटील-किन्हाळकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, चैतन्य देशमुख, ॲड. शिवाजीराव जाधव आदी उपस्थित होते.