‘महिलांनो, महिला असल्याचा अभिमान बाळगा’- पंकजा मुंडे

0
14

मुंबई : महिलांनो, महिला असल्याचा अभिमान बाळगा, महिला म्हणजे अबला हे चित्र बदलायला हवे, महिला आणि अबला हे शब्दही यापुढे जोडता कामा नये, आपण कर्तबगार असल्याचे सिद्ध करा, असे आवाहन करतानाच महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासाठी शासनामार्फत व्यापक धोरणे राबविली जातील, असेही त्यांनी यानिमित्त सांगितले.

महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी व्हावा
श्रीमती मुंडे म्हणाल्या, महिलांच्या हितासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातील महिला आणि बालविकास विभागाची जबाबदारी माझ्याकडे असून या विभागातील योजनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. कल्पकता आणि पारदर्शक धोरणांचा अवलंब करुन खऱ्या लाभार्थी महिलांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माझ्याकडील इतर खात्यांमार्फतही महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील. विशेषत: जलसंधारण विभागाकडील जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश हा गावातील पाणीसाठे वाढविण्यासाठी केला जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर वर्षानुवर्षे असलेला पाण्याच्या हंड्याचा भार कमी करण्यासाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा मला विश्वास आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. ग्रामविकास विभागामार्फत बचत गटांची चळवळ बळकट केली जाईल. तसेच मनरेगा योजनेमार्फतही ग्रामीण बेरोजगार महिलांचे सक्षमीकरण करु, असे त्यांनी सांगितले.

‘माझी कन्या भाग्यश्री’ असल्याची भावना निर्माण व्हावी
राज्य शासनाची ‘सुकन्या योजना’ आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ या नावाने राबविली जाणार आहे. सधन आणि सुशिक्षित वर्गातच स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. हे सर्व थांबायला हवे. माझी कन्या ही भाग्यश्री आहे, अशी भावना समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुले जितकी जास्त शिकतात तेवढा त्यांचा हुंड्याचा दर वाढत जातो. या मानसिकतेतूनच स्त्री भ्रुण हत्या होतात. हे रोखण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवे. माझ्याकडील महिला आणि बालविकास विभागामार्फत यासाठी प्राधान्यक्रमाने काम केले जाईल. केंद्र शासनाची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजनाही राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाईल, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

मनोधैर्यासाठी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मनोधैर्य योजनेच्या नावातच त्याचा उद्देश सामावला आहे. शासनाची ही एक अत्यंत चांगली योजना आहे. बलात्कारपीडीत, ॲसीड हल्ल्यात जखमी झालेल्या, अन्यायग्रस्त महिलांचे मनोधैर्य वाढवून त्यांना पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज असते. मनोधैर्य योजनेतून त्यासाठी प्रयत्न केले जातात. घडलेली घटना हा अपघात आहे. इतर अपघातातून सावरुन आपण आपले जीवन पुन्हा नव्याने सुरु करतो. तशाच पद्धतीने बलात्कारपीडीत, अन्यायग्रस्त महिलांनीही न खचता आपले जीवन नव्याने सुरु केले पाहिजे. यामध्ये कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे त्या म्हणाल्या. भ्रष्टाचाराइतकीच अत्याचार ही गंभीर समस्या असून ही विकृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी प्रगतीत ग्रामीण महिलांचा मोलाचा वाटा
शेतीत काम करणाऱ्या महिला ह्या खऱ्या अर्थाने ‘करिअर वुमन’ आहेत, असे मला वाटते. घर, मुलेबाळे सांभाळून त्या दिवसभर शेतात राबतात. देशाच्या कृषी प्रगतीत त्यांच्या कष्टाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. कुटुंब आणि करिअर या दोन्ही बाबी एकाच वेळी सांभाळण्याची शक्ती स्त्रियांमध्ये आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, दोन्ही भागातील महिला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या कसरतीत यशस्वी होतात. त्यामुळे महिलांच्या कार्यशक्तीचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगिमले.

सामाजिक क्षेत्रातही सहभाग हवा
राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत आहे. महिला देशाची राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, मंत्री बनू शकते, हे आतापर्यंत दिसले आहे. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात सामाजिक क्षेत्रात सहभाग घ्यायला हवा. बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांचे सामाजिकरण होत असून शासनामार्फत बचतगट चळवळीस गती दिली जाईल, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची तालुकास्तरावर निवासाची सोय व्हावी यासाठी जिजाऊ वसतीगृहे निर्माण करण्याची योजना आम्ही हाती घेतली आहे. येत्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करुन तालुकास्तरावर विद्यार्थीनींसाठी वसतीगृहे बांधली जातील, असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचारी ह्या महिला आणि बालविकास विभागाचा कणा
कुपोषण निर्मुलन हा महिला आणि बालविकास विभागाचा प्रमुख अजेंडा आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहेत. कुपोषण निर्मुलन, लसीकरण, गरोदर माता तसेच स्तनदा मातांचे संगोपन, बालकांचे पोषण अशा विविध पातळ्यांवर महिला कर्मचारी आपले योगदान देत आहेत. राज्य शासन या महिला कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांची मानधनवाढ आणि इतर मागण्यांसंदर्भात महिला दिनी घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचारी या महिला आणि बालविकास विभागाच्या कणा आहेत, असेही त्यांनी सांगितले.