राष्ट्रवादीने केला कर्तृत्ववान महिलांचा गौरव

0
10

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता वर्षारंभ
मुंबई – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता वर्ष साजरा करण्याचा आरंभ करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्वसामान्य महिलांचे जगणे समृद्ध करणाऱ्या असामान्य महिलांना जीवनगौरव पुरस्काराने आज रविवारी गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रासाठी शबाना आझमी, साहित्य क्षेत्रासाठी कविता महाजन, कला क्षेत्रासाठी श्रीमती फैय्याज, आरोग्य क्षेत्रासाठी डॉ. इंदिरा हिंदुजा,पत्रकारितेत योगदान देणाऱ्या कुमुद संघवी-चावरे, क्रीडा क्षेत्रासाठी वीणा परब-गोरे आणि कृषीसंलग्न उद्योगात ठसा उमटवणाऱ्या अनुराधा देसाई या कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare , खासदार Supriya Sule , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवेदिता माने आणि महिला प्रदेशाध्यक्षा आ. विद्या चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीतही मोलाचा वाटा उचलणारे शरद पवारसाहेब यांच्यासाठी कृतज्ञता वर्षाचा आरंभ आज होतोय. प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वासाने पुढे येत समाजातील विविध प्रश्नांची उकल करत समाजकारणात शरद पवारसाहेबांनी ठसा उमटवला. १९६७ पासून २०१४पर्यंत निवडणुकीत कधीही शरद पवारसाहेबांनी मागे वळून पाहिले नाही. ते देशातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी राजकारणात कधीही हार पत्करली नाही. २४ तास समाजकारण केले. आपण समाजाचे काही देणे लागतो, याच भावनेतून त्यांनी आयुष्यभर काम केले. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना आपल्याला त्याची राजकीय किंमत मोजावी लागेल, याची पर्वा साहेबांनी केली नाही. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षण देणारे पहिले राज्य आपले ठरले, ते पवारसाहेबांनी महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळेच. महिलांना संरक्षण खात्यात काम करण्याची संधी पवारसाहेबांनी दिली. अशा नेतृत्वाचे कृतज्ञता वर्ष आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आरंभ होते आहे, हे आपले भाग्यच आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता असलेले नेतृत्व, महाराष्ट्र आणि देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचे कृतज्ञता वर्ष आपण पुढील वर्षभर सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरे करूया.
या वेळी सन्मानित करण्यात आलेल्या महिलांनीही विचार मांडले. महिला नेहमी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत किंबहुना त्यापेक्षाही पुढे गेल्या आहेत. आपली शक्ती आपण जाणतो, ती शक्ती ओळखता आली पाहिजे, महिलांचे विचार वेगळे आहेत, आपल्याला बरोबरीनं काम करत या समाजाला पुढे घेऊन जायचे आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मांडले. देशात प्रथमच टेस्ट ट्यूब बेबीचा यशस्वी प्रयोग करणार्यात डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी या सृष्टीत नवा जीव निर्माण करण्याची शक्ती देवाने फक्त स्त्री दिली आहे, तिने स्वतःला ओळखायला हवे, असे मत व्यक्त केले.
कला क्षेत्रातील योगदानबद्दल जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना फैयाज यांनी तरुण, युवतींना विनंती केली की, आपल्यासाठी हा काळ खडतर आहे, वाटेत अनेक काटे आहेत. आपण या परिस्थितीतून मार्ग काढत आपल्याला समाजासाठी, कुटुंबासाठी काही तरी करायचे आहे, अशी शपथ आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. लिखाणातून सातत्याने सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या कुमुद संघवी- चावरे यांनी अनुभवकथन करताना मी आई आहे, त्यामुळे राजकारण आणि समाजकारण याकडे मी आईच्या दृष्टीने पाहिले. त्यामुळे मला समाजासाठी अनेक लेख लिहिता आले, असे स्पष्ट केले.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. बाईच बाईची शत्रू असते असा खोटा बनाव केला जातो. मात्र बाईच बाईची खरी मैत्रीण आहे. महिला सक्षम झाल्या आहेत. आता हे थांबवून पुरुष सबलीकरण करायला हवे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्याने पुरुषांच्या मनाचे खच्चीकरण झाले आहे, असे मत लेखिका कविता महाजन यांनी व्यक्त केले.
या वेळी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सक्षमपणे लढा देणाऱ्या, कोणत्याही विरोधाला, दबावाला बळी न पडता जिद्दीने यशस्वी पाऊल टाकणाऱ्या कॉन्स्टेबल पूनम ताकदसिंग पाटील यांनाही विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आबांची आठवण प्रखरतेने येते – सुप्रिया सुळे
हक्काचा भाऊ गमावला, अशी प्रचिती आबा गेल्यावर आपल्या सगळ्यांना येतेय. शरद पवारसाहेबांच्या कृतज्ञता वर्षाचा आरंभ करताना आबांची आठवण येते आहे. आज आबा असते, तर ते याठिकाणी आले असते असं सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांनी महिलांना पोलीस खात्यात सन्मानाने काम करू दिले. आज त्यांच्यामुळेच पोलीस खात्यात महिलांची संख्या जास्त आहे असे सांगून सुप्रियाताईंनी सत्तेची पर्वा न करता समाजकारण करणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे घेऊन शरद पवारसाहेब आपले काम करत आहेत, असे नमूद केले.
शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमपणे काम करत आहेत. आपल्यासारख्या महिलांना पुढे आणणार्याअ नेतृत्वास उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवेदिता माने यांनी या वेळी केली.