विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे आर.आर.पाटील, पानसरे यांना आदरांजली

0
16

मुंबई : सकारात्मक विचारसरणीतून राजकारण करीत लोकहिताचे धाडसी निर्णय घेऊन सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारा संवेदनशील नेता सभागृहाने गमावला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना आदरांजली अर्पण केली.

सोमवारी विधानसभेत शोकप्रस्तावाद्वारे विधानसभा सदस्य माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव उर्फ आर.आर. पाटील, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री जगन्नाथराव शंकर जाधव, रमेश पान्या वळवी, विधानसभा सदस्य प्रकाश उर्फ बाळा सावंत, माजी सदस्य भागुजीराव शंकरराव गाडे-पाटील, सुखदेव पुंडलिक उईके, रामकिशन रामचंद्र दायमा, विश्वनाथराव सूर्यभान जाधव तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंदराव पंढरीनाथ पानसरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

आर.आर. पाटील यांना आदरांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या इतिहासात नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वत:हून स्विकारणारे ते पहिले नेते होते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी उत्तम कार्य केले. डान्सबार बंदी, पोलीस भरती, पोलीस भरतीतील महिलांचा समावेश, तंटामुक्ती असे धाडसी निर्णय घेऊन त्यांनी सामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. उत्कृष्ट संसदपटू म्हणून पहिला पुरस्कार मिळविणारा आणि सामाजिक बांधिलकी असणारा नेता आज आपल्यात नाही, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पानसरे यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राचे नुकसान- मुख्यमंत्री

सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांना आदरांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असंघटित कामगारांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

या शोक प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, आर.आर. पाटील यांचे जीवन संघर्षमय राहिले. सर्वसाधारण परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण घेऊन राजकीय वाटचाल केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनावर त्यांनी आपल्या विचारातून एक वेगळी ओळख निर्माण केली. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने मत मांडून तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. श्री. विखे-पाटील पुढे म्हणाले, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनाने पुरोगामी महाराष्ट्राचे नुकसान झाले असून नगर जिल्ह्याचा भूमीपुत्र हरपला आहे.

सदस्य अजित पवार म्हणाले, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आर.आर. पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द यशस्वी केली. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणारे निष्पाप मनाचे, सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे त्यांचे नेतृत्व होते. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांचा ध्यास होता. आपण सर्वांनी तंबाखूपासून मुक्त होऊ अशी शपथ घेतल्यास तीच खरी आबांना श्रद्धांजली ठरेल.

या शोक प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, जयंत पाटील, डॉ. पतंगराव कदम, छगन भुजबळ, शरदराव सोनवणे, अर्जुनराव खोतकर, अबु आझमी यांनी भावना व्यक्त केल्या.