गोंदियाच्या पोस्ट खात्यात कोट्यवधीचा आरडी-एसबी घोटाळा?

0
15

योग्य चौकशी झाल्यास अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता
तिरोडा येथे चौकशी अधिकारी दाखल

गोंदिया- गोंदिया व तिरोडा शहरातील पोस्टात कोट्यवधीचा आरडी-एसबी घोटाळा झाल्याची चर्चा बाहेर आली आहे. याप्रकरणी मुख्य पोस्टमास्टर नागपूर अत्यंत गोपनीय चौकशी करीत असल्याची कुणकूण लागली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पोस्टल खात्यात एकच धावपळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथे उमेश माहुले हे ग्रेड-१ पोस्ट मास्टर या पदावर कार्यरत होते. त्याचे स्थानांतर गेल्या १५-२० दिवसापूर्वी तिरोडा येथे झाले. सूत्रांनुसार, माहुले हे मूळ चंद्रपूरचे असल्याचे कळते. माहुले यांनी विनंतीवरून त्यांचे मूळविभाग चंद्रपूर येथे बदलीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूरही झाल्याचेही सांगण्यात येते. पण त्यांनी तेथे न जाता गोंदियात राहून सदर कारस्थान केले. यानंतर त्यांचा कामाचा झपाटा पाहून वरिष्ठांनी गेल्या १५-२० दिवसापूर्वी त्यांचेवर तिरोडा डाकघराची जबाबदारी सोपविली. या संधीचा पुरेपूर फायदा उचलून माहुले यांनी चंद्रपूर न गाठण्याचा कट आखल्याची चर्चा पोस्टल वर्तुळात आहे.
दरम्यान, माहुले यांनी गोंदिया येथे असताना सुमारे अडीच कोटीच्या वर आरडी आणि बचत खात्यात घोटाळा केल्याचे बोलले जात आहे. माहुले यांनी तिरोडा येथे स्थानांतर झाल्यावर अवघ्या १५-२० दिवसात ६ लाख ७५ हजार रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पोस्टखात्याचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळत असल्याचे वृत्त आहे.
सूत्रानुसार, केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येणाèया विभागात पाच लाखाच्यावर अफरातफर झाल्यास त्याची चौकशी सीबीआय कडे सोपविली जाते. असे असताना गोंदियाच्या पोस्ट खात्यातील अधिकाèयावर अडीच कोटी अफरातफर केल्याचा आरोप असताना नागपूरचे प्रधान पोस्टमास्टर हे अत्यंत गोपनीयरीत्या चौकशी करीत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, माहुले हे पोस्टातील आवर्ती ठेव परिपक्व झाल्यानंतर खातेदाराला त्याचे पैसे परत केल्यानंतर पासबुक आपले कडे ठेवून घेत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. यानंतर सदर खाते बंद न करता त्यात हेरफेर करून काही काळानंतर त्यातून ते पैसे विड्राल करीत असल्याचे सांगण्यात येते. अशीच काहीशी कार्यपद्धती बचत खात्यासंबंधीही वापरल्याची शक्यता आहे. याकामी त्यांना काही अधिक कर्मचारी सहकार्य करीत असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहुले हे गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथे कार्यरत शाखा डाकपाल यांच्यासह संयुक्तरीत्या कंत्राटदारीमध्ये गुंतवणूक करीत असल्याची कुणकूण आहे. याशिवाय कोण्या राजू देशमुख या व्यक्तीच्या माध्यमातून माहुले यांची काही वाहने विमानतळ परिसरात भाड्याने कार्यरत असल्याचीही माहिती आहे. माहुले यांच्या या गैरप्रकारात सालेकसा भागातील एक कर्मचारीसुद्धा समाविष्ट असल्याची कुणकूण आहे. या व्यक्तीने खमारी येथे घर बांधकाम केल्याची माहिती आहे. याप्रकरणात इंगळे नामक व्यक्तीसुद्धा चर्चेत आहे. उल्लेखनीय म्हणजे ही इंगळे नावाची व्यक्ती ही गोंदिया येथील डाकघर कार्यालयात यापूर्वी सहायक अधिक्षक म्हणून कार्यरत होती. माहुले यांना गोंदियाच्या पोस्टमास्टरपदी विराजमान करण्यात इंगळे यांची मोलाची भूमिका आहे. पोस्टखात्यामध्ये इंगळे हे माहुले यांचे ङ्क गुरूङ्क म्हणून ओळखले जातात. दरम्यान, इंगळे हे विभागांतर्गत वादग्रस्त असून त्यांची अनेक प्रकरणात विभागीय चौकशीही सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रकरणाची योग्य चौकशी झाल्यास यात किमान २० ते २५ कर्मचाèयांवर बडतर्फीची कारवाई शक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असे झाल्यास राष्ट्रीय पातळीवरील ही मोठी कारवाई असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी नागपूर येथील चौकशी पथक आज तिरोडा येथे रुजू झाल्याचेही सूत्रांकडून कळते. हे चौकशी पथक अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्य करत असल्याने या चौकशी पथकाविषयी सुद्धा पोस्टल खात्यात संशय निर्माण झाला आहे.

आरोप सिध्द झाल्यानंतर कळेल-उपविभागीय डाक निरिक्षक श्री पटेल
या संदर्भात उपविभागीय डाक निरिक्षक पटेल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी अशा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले,मात्र तिरोडा येथे आज याप्रकरणात चौकशी समितीने चौकशी केली काय यावर मात्र त्यांनी अद्यापही कुनावर आरोप सिध्द झालेले नाही,ते चौकशी नंतरच कळेल असे सांगितले.तर ज्यांच्यावर हे आरोप आहेत ते मार्हुेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.