सामाजिक दायित्वातून रिलायंसने उभारले गोंदियात कँसर रुग्णालय

0
21

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केली होती समुहाने रुग्णालयाची घोषणा
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.२९ः-कंपनी क्षेत्रात कार्य करीत असतानाच त्या त्या राज्यातील सरकारने ग्रामीण भागातील विकासासाठी सामाजिक दायित्व म्हणून सुचविलेल्या सुचनांकडे लक्ष देत देशातील विविध कार्पोरेट कंपन्या(उद्योग)आपला सीएसआर निधी खर्च करतात.आजपर्यंत हा निधी रस्ते,नाल्या व सभागृह,मंडप बांधकामावर खासदार खर्च करायचे.परंतु आत्ता यात हळूहळू बदल होत चालला असून रिलायंस समुहाने रुग्णासांठी चांगली आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने काम सुरु केले आहे.रिलायंस समुहाने आपल्या सीएसआर फंडाचा वापर आरोग्यसेवेसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला.त्याअंतर्गतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रिलायंस समुहाच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटल(केडीएएच)ने सामाजिक दायित्व या भूमिकेतून महाराष्ट्रात १८ कर्करोग केंद्र सुरु करण्याची ग्वाही ऑगस्ट २०१६ ला दिली होती.त्यानुसार पहिल्या टप्यात ३ कर्करोग रुग्णालय(कँसर)गोंदिया,अकोला व सोलापूर येथे सुरु करण्याचे जाहिर केले होते.त्या कळीतील या तिन्ही कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून रुग्णांना प्राथमिकस्तरावर सेवा देण्यास सुरवात करण्यात आलेली आहे.

पुर्व विदर्भात कँसरचे मोठ्याप्रमाणात रुग्ण असल्याने आणि गोंदियात हे शहर दळणवळणाच्या साधनाने सोयीस्कर असल्याने गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गाला लागून हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.ऑक्टोंबर २०१८ मध्ये पुर्णत्वास आलेल्या या कँसर रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्याच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोंदिया येथील कँसर रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात येणाèया रुग्णाला शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजंनाचा सुध्दा लाभ देण्यात येणार आहे.यामुळे कर्करोगावर उपचारासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्हे गडचिरोली,चंद्रपूर व मध्यप्रदेश राज्यातील बालाघाटसह छत्तीसगड मधील डोंगरगढ परिसरातील रुग्णांना सुध्दा नागपूर,रायपूर,हैद्राबाद किंवा मुंबईच्या रुग्णालयाकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही.या रुग्णालयात नवरात्रोत्सवकाळात अष्टमीला समुहाच्या प्रमुख टिना अंबानी यांनी पुजाअर्चना करुन रुग्णालयाचे औपचारिक शुभारंभ केले.या रुग्णालयात रुग्णांवर उपचार मुंबई येथील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी येथील कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. सुसज्जीत रुग्णालयामध्ये रेडिएशन व केमोथॅरेपी या दोन उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे,अशी माहिती कर्करोग रुग्णालयाच्या कार्मिक व्यवस्थापन प्रमुख कु. निकीता सक्सेना यांनी दिली.