विठुरायाच्या पुजारी निवडीसाठी परीक्षा

0
16

– वृत्तसंस्था
पंढरपूर : सर्वच परीक्षा ठराविक अभ्यासक्रमावर घेतल्या जातात. मात्र देवाची पूजा आणि नित्योपचार करण्यासाठी परीक्षा असू शकते, हे मात्र थोडे नवलच वाटतं आहे ना… मग अशी परीक्षा घेतली जाते आहे आणि ती देखील साक्षात विठुरायाच्या परिवार देवतांच्या पुजारी पदासाठी.

मंदिर समितीच्या ताब्यात सर्वोच्च न्यायालयाने मंदिराची सर्व सूत्र दिल्यानंतर अध्यक्ष आण्णा डांगे यांनी प्रथम विठ्ठलाच्या पूजेसाठी हिंदू धर्मातील सर्व जातींच्या पुजाऱ्यांची नेमणूक करून देशात सामाजिक क्रांतीचा संदेश दिला होता. या पाठोपाठ रुक्मिणी मातेच्या पूजेला महिला पुजाऱ्याची नेमणूक करून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. आता विठ्ठल मंदिराच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील २८ परिवार देवतांच्या मंदिरातील नित्योपचार करण्यासाठी हिंदू धर्मातील सर्व जाती मधील इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा आज मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आली.मंदिर समितीच्या तुकाराम भवनमधील मोठ्या हॉलमध्ये पुजारीपदाची ही परीक्षा घेण्यात आली.
२२ पदांसाठी आलेल्या ४४ उमेदवारांना ७५ मार्कांची लेखी परीक्षा ऑबजेक्टीव्ह प्रश्न स्वरुपात घेतली गेली. या परीक्षेसाठी ब्राम्हण, मराठा, धनगर, जंगम, सोनार, महार अश्या सर्व आठरापगड जातीमधील ३७ उमेदवार उपस्थित होते. यात ४ महिलांचा समावेश असून हे सगळे उमेदवार पंढरपूर परिसरातील आहेत. या लेखी परीक्षे नंतर २५ गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणार असून सरस ठरणाऱ्या २२ उमेदवारांची भरती पुजारी म्हणून केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बडवे, उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे सर्व हक्क डावलून मंदिर शासनाच्या ताब्यात देताना ही सर्व परिवार देवतांची मंदिरे समितीच्या ताब्यात आली होती. मात्र पुजाऱ्यांची नेमणूक न केल्याने न्यायालयाच्या निर्णय नंतरही ही मंदिरे पूर्वीच्याच मानकऱ्यांच्या ताब्यात होती. आता मात्र मंदिर समितीने पुजाऱ्यांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने ही २८ मंदिरे समितीच्या ताब्यात येणार असून येथील उत्पन्नही थेट आता देवाच्या खजिन्यात जमा होणार आहे .