‘नेमाडेंचे साहित्य म्हणजे मराठीचा खजिना’- शरद पवार

0
14

संत नामदेवनगरी, घुमान – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका करणारे ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद नेमाडे यांचे साहित्य म्हणजे मराठी वाड्‍मयातील खजिना असल्याचे गौरवोद्‍गार राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. घुमान येथे साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनाप्रसंगी पवारांनी संबोधित केले.

पवार म्हणाले की, यंदाचे मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये होत असल्याचा आनंद होत आहे. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडेंचे साहित्य म्हणजे मराठी साहित्याचा खजिना असल्याचे सांगत शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला.मात्र, मुंबई, पुणे, नागपुरात मराठी टक्का घसरत असल्याची खंत देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी ही ज्ञान भाषेसह विज्ञान भाषा होणे गरजेचे आहे.
तत्पूर्वी संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे 88 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज (शुक्रवारी) मोठ्या थाटात प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, विद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी प्रास्ताविक मांडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे सदानंद मोरे यांच्याकडे सोपवली.
अहमदशाह अब्दालीचा तहाचा प्रस्ताव धुडकावत शीखांच्या सहकार्याने उत्तर भारतात युद्धाला उभे ठाकलेले मराठे हे अखंड हिंदुस्थानचे पहिले पुरस्कर्ते होते असे ठामपणे घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यश्र सदानंद मोरे यांनी सांगितले. पंजाबपर्यंतच्या प्रांतावर अब्दालीचे राज्य राहील आणि त्या पलीकडच्या भागावर मराठ्यांनी राज्य करावे असा प्रस्ताव अब्दालीने मराठ्यांना दिला होता. परंतु हिंदुस्थानची सीमा कंदाहार – काबूलपर्यंत असल्याचे सांगत मराठ्यांनी तह केला नाही आणि भारतातल्या सगळ्या जाती – धर्माच्या राज्यांना घेत अब्दालीचा मुकाबला करण्याची तयारी केल्याचे मोरे म्हणाले. या युद्धामध्ये शीखांनी मराठ्य़ांना साथ दिल्याचे सांगताना मोरे यांनी शीख धर्म स्थापन होण्यापूर्वीपासून नामदेवांच्या माध्यमातून पंजाब व महाराष्ट्र यांच्या सहकार्याला सुरूवात झाली होती असे प्रतिपादन मोरे यांनी केले. नामदेवांचे अभंग गुरू ग्रंथसाहिबमध्ये येतात कारण त्याआधी शेकडो वर्षे नामदेवांनी पंजाबचं व महाराष्ट्राचं नातं जोडलेलं असतं असं मोरे सांगतात.
त्यामुळे देश स्वतंत्र होण्याअगोदरपासून महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये जिव्हाळयाचे संबंध होते आणि महाराष्ट्र पंजाबचे तर पंजाब महाराष्ट्राचे रक्षण करताना अनेकांनी पाहिले आहे, असे ते म्हणाले. अनेक दाखले देत मराठे – शीख यांच्या मैत्रीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे आजपासून ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठया थाटात प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. सदानंद मोरे बोलत होते.
हिंदुस्थान ही सगळ्यांची भूमी आधी मराठ्यांची असल्याचे सांगत धर्मनिरक्षेप राजकारण मराठ्यांनी आधी सांगितले पंजाब हा महाराष्‍ट्राचे आणि महाराष्ट्र हा पंजाबचे रक्षण करतोय. कारण दोन्ही राज्यात ऐतिहासिक नाते आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घुमानला साहित्य संमेलन भरवल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे आभार मानले. घुमानसाठी चौपदरी रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल अशी घोषणाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी केली.