गोंदिया, बालाघाटमध्ये वाढले सारस!

0
40

गोंदिया,दि.18–ःजून महिन्यात करण्यात आलेल्या सारस गणनेत महाराष्ट्रात ४६ पक्षी आढळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४२, भंडारा तीन तर चंद्रपूर जिल्ह्यात एक सारस आढळले आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ही संख्या ५४ इतकी आहे. सेवा संस्थेतर्फे मागील सात-आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संर्वधनासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा परिणाम यानिमित्ताने दिसून आला असून मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्रातील गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट हे जिल्हे सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण ठरले आहेत. वैनगंगा, वाघ नदीचा किनाऱ्यावर सारस दिसून येत असून पर्यटकांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात ४२ सारस होते. यामध्ये गोंदिया जिल्ह्यात ३८, भंडारा तीन तर चंद्रपूरमध्ये एक होता. गोंदिया जिल्ह्यातील सारसची संख्या चारने वाढल्याचे दिसून येत आहे. तर बाघालाट जिल्ह्यात सहा सारस वाढले आहेत. जून रोजी बालाघाट जिल्ह्यातील ५० ते ६० ठिकाणी २० चमूच्या माध्यमातून व गोंदिया-भंडारा जिल्ह्यात ९ जून रोजी २२ चमूच्या माध्यमातून ही गणना करण्यात आली. या गणनेसाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, आय. आर. गौतम, गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, दक्षिण बालाघाटचे मंडळ अधिकारी देवप्रसाद, सहाय्यक वनसरंक्षक विकास माहोरे, सुशील नांदवते, पी. बी. चन्ने, शेषराव आकरे, अरुण साबळे यांनी सहकार्य केले.

गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान हे पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. नवेगावबांध परिसरात दरवर्षी विदेशी पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. त्यामुळेच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनी भेट देतात. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे. सेवा संस्थेतर्फे दरवर्षी सारस पक्षांची गणना केली जाते.

गावकऱ्यांमध्ये जनजागृती

सारस पक्ष्यांचे नैसर्गिक महत्त्व असून कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे कामसुद्धा ते करतात. शेतातील धानाच्या मुळांना त्यांच्या दबावामुळे पोषक तत्वे मिळते. त्यामुळे ते एकप्रकारे शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही काम करतात. म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तलाव आणि शेतीच्या परिसरात सारस पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध घेऊन सेवा संस्थेचे सदस्य त्यांच्या संवर्धनासाठी यावर नजर ठेवतात. तसेच सारस पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरातील गावकऱ्यांना सारस पक्ष्यांची घरटी कशी असतात, त्यांचे संवर्धन कसे करायचे याबाबत मागदर्शन केले जाते.

सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच दरवर्षी सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सारस पक्ष्यांची घरटी असलेल्या शेतमालकाला त्यांच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यातून सारस संवर्धनास मदत होईल.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था