वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

0
42

नागपूर,दि.18 : शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने  शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली .
विठोबा दसरू वडुले (६२, रा. धानोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची धानोली शिवारात अडीच एकर शेती असल्याने ते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान, ते गुरांना पाणी पाजत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. ते दुपारपर्यंत घरी परत न असल्याने मुलगा शेषराव यांनी शेत गाठले. ते शेतात दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चपला व रक्त जमिनीवर पडले असल्याचे आढळून आले. त्या आधारे त्यांनी शोध घेतला असता, विठोबा यांचा मृतदेह उंबरविहिरीत परिसरातील जंगलात आढळून आला.
माहिती मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक गवई, सहायक उपवन संरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने विठोबा यांच्या मानेचा लचका तोडल्याचेही आढळून आले. त्याने विठोबा यांना धानोली शिवारातून उंबरविहिरीच्या जंगलात फरफटत आणल्याचेही स्पष्ट झाले. हा परिसर काटोल तालुक्यालगत असल्याने वाघाचा या तालुक्यातील मासोद, कोंढाळी परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातही वाघाची दहशत निर्माण झाली आहे