अरुणा शानबाग यांचे निधन

0
16

मुंबई, दि. १८ – गेली ४२ वर्ष कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून शानबाग यांची प्रकृती अत्यवस्थ होती. सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास शानबाग यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेली ४२ वर्षे अरुणा यांच्यावर केईएम रुग्णालयातील ४ ए वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. १९७३ मध्ये रुग्णालयातील वॉर्डबॉयने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर शानबाग कोमामध्ये गेल्या होत्या. त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या होत्या. सध्या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अरुणा यांची काळजी घेत होत्या. शानबाग प्रकऱणानंतरच भारतात इच्छा मरणाची मागणी जोर धरु लागली व याप्रकरणी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून अरुण शानबाग यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. तब्बल ४२ वर्ष मृत्यूशी झुंज देणा-या शानबाग यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. शानबाग यांचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी पुढे यावे असे आवाहन केईएम प्रशासनाने केले आहे.