उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे २१ व२२ मे रोजी आयोजन

0
33

अ.भा.नवोदित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि.मोरेश्वर मेश्राम
पुणे दि. १८ – : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित २२ व्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक,चित्रपट निर्माते इंजि. मोरेश्वर मेश्राम यांची निवड करण्यात आली असल्याचे परिषदेच्यावतीने अभामसापचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. हे साहित्य संमेलन २१ व २२ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे संपन्न होत असून स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने महाराष्ट्रात अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक नारायण सुर्वे, प्रा.सुरेश भट, शिवाजी सावंत, फ.मु.शिंदे, रा.र.बोराडे, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. विठ्ठल वाघ,मंगेश पाडगावकर, इ. भुषविले आहे. आता २२ अ.भा.नवोदित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विदर्भाच्या वाट्याला चालून आले असून भंडारा येथील सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि.मोरेश्वर मेश्राम हे आता हे पद भुषविणार आहेत. यापूर्वी इंजि.मोरेश्वर मेश्राम यांनी,युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले असून त्यांना राष्ट्रीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार, राष्ट्रीय – महात्मा ज्योतिबा पुâले समाजकार्य पुरस्कार, राष्ट्रीय दिनबंधु दलित सेवा पुरस्कार, राष्ट्रीयउत्कृष्ट वक्ता पुरस्कार, ललित युवा पुरस्कार, निबंधकार पुरस्कार, रंगभुमी पुरस्कार, युवा लेखक पुरस्कार, काव्य पुरस्कार, जिल्हा वक्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी नवोदितांना संधी देण्यासाठी अखिल भारतीय नाट्यसंमेलन, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा , राष्ट्रीय युवा परीषद , राज्य काव्य स्पर्धा, राज्य परीसंवाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लेखन कार्यातही ते अग्रेसर असून त्यांचा ‘खरं-खरं’ हा काव्य संग्रह प्रसिध्द आहे. त्यांचा हा काव्यसंग्रह संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. त्यांनी आतापर्यंत चार हजार भाषणे,एक हजार कविता,१६ एकांकिका,१ नाटक लिहीले आहे. विदर्भात चित्रपट निर्मितीचे मोठे कार्यही त्यांच्याच नावे आहे. त्यांनी ३१ डिसेबर, ‘ रेला रे’ एक अलिखीत संस्कृती, व्हि.सी.डी. प्यार से बोलो यारो जयभीम, लॉस्ट बेंचर अशा चित्रपटांची निर्मिती करीत वैदर्भीय कलावंताना व्यासपिठ उपलब्ध करून दिला. आता २२ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविण्याचा मान त्यांना मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.