‘अकबर ‘ग्रेट’, मग महाराणा प्रताप का नाही?’

0
15

वृत्तसंस्था
जयपूर दि. १८ – मुघल सम्राट बादशहा अकबर यांना महान असे संबोधण्यात येत असेल तर, महाराणा प्रताप यांनाही महान ठरविण्यात अडचण का येत आहे, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उपस्थित केला आहे.
प्रतापगड येथे महाराणा प्रताप यांच्या मुर्तीचे अनावरण राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राजनाथसिंह यांनी इतिहासात योग्य ते बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले. महाराणा प्रताप हे महान होते आणि आपण मनुष्यबळ मंत्रालयाला सीबीएसई अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्यावर माहितीचा धडा समावेश करण्याची मागणी करणार असल्याचेही, राजनाथसिंह यांनी सांगितले.
राजनाथसिंह म्हणाले, ‘‘महाराणा प्रताप महान होते, असे माझे म्हणणे आहे. त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर मेवाडची आठवण होते. महाराणा प्रताप यांची यशोगाथा भारतासह जगभरात पोहचविण्याचे काम केंद्र सरकार करेल. महाराणा प्रताप यांची 475 वी जयंती देशभरात साजरी करण्यात येणार आहे. आपल्या मातृभुमीच्या संरक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आपले सर्वकाही गमाविले.‘‘