गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्ञानाचा उपयोग करा- मुख्यमंत्री

0
14

नाशिक ता. २३: आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या यशस्वी स्नातकांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्ञानाचा उपयोग करावा आणि देशभक्त पदवीधर होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या 14 व्या दीक्षांत समारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरु डॉ. अरुण जामकर, प्रति कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर, परीक्षा नियत्रंक कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात काम करण्यासाठी डॉक्टर तयार नसल्याबद्दल खंत व्यक्त करुन श्री. फडणवीस म्हणाले, केवळ कायद्याने हा बदल शक्य होणार नाही. त्यासाठी पदवी प्राप्त केल्यानंतर युवकांनी संवेदनशीलतेने विचार करायला हवा. समाजातील समस्या पाहून अस्वस्थता येणे, या समस्या दूर करण्याची भूमिका स्वीकारणे आणि अनुकूल बदलासाठी एखादी योजना अमलात आणणे या देशभक्तीच्या पायऱ्या आहेत, याचा विचार युवकांनी करायला हवा. अशी मानसिकता तयार झाल्यास सामान्य जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सुटू शकतील आणि जीवनाची पदवी मिळविल्याचे समाधान युवकांना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने पुढे जात असताना 40 टक्के बालके कमी वजनाची जन्माला येतात, ही दुर्दैवाची बाब आहे. कुपोषणामुळे मुलांची क्षमता कमी होवून त्याचा एकूण विकासावर परिणाम होतो. याचा विचार करुन समस्या दूर करण्यासाठी संशोधनावर अधिक भर देण्यात यावा. विद्यापीठ संशोधनाचे केंद्र व्हायला हवे. ज्ञानदानाचे कार्य करताना समाजाशी नाते जोडून समाजातील समस्यांचे प्रतिबिंब विद्यापीठाच्या कार्यात दिसायला हवे. पुस्तक आणि व्यवहार्यज्ञान यांच्यातील तुटलेल्या संबंधामुळे शिक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहते. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले.

श्री.फडणवीस म्हणाले, दीक्षांत समारंभाद्वारे देशाच्या आणि समाजाच्या सेवेत एक पिढी दाखल होत असते. त्यामुळे या समारंभाला विशेष महत्व आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात हा महत्वाचा क्षण असतो. मात्र आनंद व्यक्त करताना त्यासोबत जबाबदारीही येत असते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. आपण मुल्याचे पालन किती प्रमाणात केले यावर जीवनाची पदवी मिळत असते आणि मुल्याचे पालन करणाऱ्यांची आठवणच समाज ठेवतो, असे त्यांनी सांगितले. समाजाने विद्यापीठ उभे केले म्हणून शिक्षणाची संधी मिळाली हे न विसरता त्याची परतफेड करण्याची भावना निर्माण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने पदवीधर झाल्याचा आनंद मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, माणसाचे आरोग्य चांगले असेल तर त्याला जीवनातला आनंद घेतला येईल आणि आरोग्य चांगले असणे डॉक्टरांच्या हातात आहे. पदवी प्राप्त करताना स्नातकांनी राष्ट्रभक्तीची घेतलेली शपथ लक्षात ठेऊन सामान्यजनांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयोगशील रहावे. सामान्य माणसाच्या योगदानावर वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा उभ्या आहेत हे लक्षात घेऊन जनतेशी कायमचे नाते जुळेल असे सेवाभावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी स्नातकांना केले.

दीक्षांत कार्यक्रम हा शैक्षणिक प्रक्रियेतील शेवटचा टप्पा नसून ती शिक्षणाच्या नव्या दालनाची सुरूवात आहे, असे नमूद करून श्री.तावडे यांनी स्नातकांना वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. परिपूर्णतेच्या दिशेने पाऊले टाकताना ज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. मुल्याधिष्ठीत जीवन जगा आणि अनुशासनाचे पालन करा, असा उपदेशही त्यांनी स्नातकांना दिला.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. सेवाभावनेने कार्य करीत सुरूवातीची काही वर्षे ग्रामीण भागात काम केल्यास जीवनातील मोठे समाधान प्राप्त करता येईल. नवनवीन रोगांच्या आव्हानांना सामारे जाण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करून संशोधनावर अधिक भर देण्याची गरज आहे. विद्यापीठाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे चांगले कार्य केले आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

कुलगुरू डॉ.जामकर यांनी विद्यापीठाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा आपल्या भाषणात घेतला. गुणवत्तेला चालना देण्यासाठी परदेशातील विद्यापीठांसोबत करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्वत्जनांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त केलेल्या 71 स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 2753 तर पदव्युत्तर पदवीचे 157 विद्यार्थी, दंत वैद्यक विद्याशाखेचे पदवीचे 608 तर पदव्युत्तर पदवीचे 9 विद्यार्थी, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे 2027 विद्यार्थी, तर पदव्युत्तर पदवीचे 78 विद्यार्थी, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे 917 तर पदव्युत्तर पदवीचे 46, बी.पी.टी.एच पदवीचे 377 विद्यार्थी, बी.ओ.टी. एच. पदवीचे 41 विद्यार्थी, बीएएसएलपी पदवीचे 53 विद्यार्थी, पी.जी. तत्सम विद्याखाखेच्या अभ्यासक्रमाचे 26 विद्यार्थी, पदविका विद्याशाखा (बी.पी.एम.टी.) पी.जी.डी.एम.एल.टी, ऑप्टोमेट्री व ऑप्थल्मिक व एम.एस्सी फार्मा अभ्यासक्रमाचे 117 विद्यार्थी अशा एकूण 7478 विद्यार्थ्यांना पदवीका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. तसेच वैद्य ए. सुलोचना, वैद्य नीता महेशकर, वैद्य रामा देवी, वैद्य निनाद साठे, वैद्य आशुतोष पाटणकर, वैद्य विश्वनाथन कविथा, डॉ. संदिप साठे, डॉ. जी. चंद्रा राव व डॉ. गायत्री सीरुर या 9 विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोहा येथे झालेल्या युथ ॲथलॅटिक्स खेळामध्ये सुवर्ण पदक मिळविणाऱ्या दुर्गा देवरे आणि किसन तडवी तसेच त्यांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सत्कार करण्यात आला.